तभा वृत्तसेवा
राळेगाव,
mahakal-group : तालुक्यातील वाढोणाबाजार परिसरात सुरू असल्याची चर्चा असलेल्या कथित अवैध धंद्यांविरोधात आता नागरिकांचा आवाज बुलंद होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राळेगाव झाडगाव-वाढोणाबाजार येथील महाकाल ग्रुपने केली आहे. या संदर्भात सोमवार, 22 जून रोजी राळेगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, वाढोणा बाजार परिसरात गेल्या काही दिवसांपासून कथित स्वरूपात वरळी मटका, जुगार तसेच इतर बेकायदेशीर धंदे सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. या प्रकारामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिकांनुसार, राळेगाव येथील एका व्यक्तीचा या कथित अवैध व्यवसायाशी संबंध असल्याचा संशय आहे. याशिवाय रात्री गो-तस्करीसारख्या बेकायदेशीर प्रकारांबाबतही नागरिकांकडून तक्रारी येत आहेत. त्यामुळे या सर्व बाबींची वस्तुस्थिती प्रशासनाने तपासून पाहणे अत्यंत गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अवैध धंद्यांमुळे युवक वर्ग भरकटत असून सामाजिक वातावरण दूषित होत असल्याची चिंता महाकाल ग्रुपने व्यक्त केली आहे. वाढोणा बाजार परिसरातील या सर्व कथित प्रकारांची महसूल, पोलिस व संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी निवेदन देताना महाकाल ग्रुपचे सौरभ गेडाम, शरद नेहारे, विशाल वैद्य, कुणाल वैद्य, विशाल खडस्कर, अनिकेत आत्राम, कुणाल खडसे, सुरत थुटूरकर, मनीष मेश्राम, अनंत मेश्राम, सौरभ ठोंबरे, राज शेंडे, दीपक दोडके, सचिन झाडे, प्रथमेश कोदाने, प्रतीक जुनघरे, पवन खडसे, कार्तिक कोदाने, प्रथमेश इंगळे, सोहम थुटूरकर यासह अनेकजण उपस्थित होते.
चर्चा जोरात, पण कारवाई कधी..?
वाढोणा बाजार परिसरात कथित अवैध धंद्यांबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी अद्याप ठोस कारवाई झालेली दिसत नसल्याने नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रशासन या निवेदनाची किती गांभीर्याने दखल घेते आणि चौकशीचे चक्र किती वेगाने फिरते, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.