मुंबई,
Mahayuti in Legislative Council महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून राज्यभरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. १७ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत मतदानापूर्वीच सहा जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित जागांसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी पार पडत आहे.या निवडणुकीत विजयासाठी वैध मतांच्या ५० टक्के अधिक एक मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पहिल्या पसंतीतील मतांमधून कोटा पूर्ण झाल्यास निकाल लवकर स्पष्ट होतो, अन्यथा दुसऱ्या पसंतीच्या मतांची गणना केली जाते. त्यामुळे अनेक मतदारसंघांतील निकालांवर सर्वांचे लक्ष लागून होते.

यंदाच्या निवडणुकीत महायुतीने अनेक ठिकाणी मजबूत पकड दाखवली. ठाणे, यवतमाळ, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर आणि अहिल्यानगर या सहा मतदारसंघांत उमेदवार बिनविरोध विजयी झाले. यामुळे मतदानाआधीच महायुतीला मोठा दिलासा मिळाला होता.मतमोजणीत काही मतदारसंघांनी विशेष लक्ष वेधले. नाशिकमध्ये अनपेक्षित निकाल लागला असून भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांनी विजय मिळवत सर्वांना धक्का दिला. भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी दमदार कामगिरी करत विजय मिळवला. नागपूरमध्ये भाजपचे राजीव पोतदार विजयी ठरले, तर परभणी-हिंगोलीमध्ये शिवसेनेचे सईद खान यांनी बाजी मारली. छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात भाजपचे सुहास शिरसाट यांनी विजय संपादन केला.
राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारीही लक्षणीय राहिली. नाशिक आणि भंडारा-गोंदियामध्ये शंभर टक्के मतदान झाले. सांगली-सातारा, परभणी-हिंगोली आणि सोलापूरमध्येही मतदानाचा टक्का अत्यंत उच्च राहिला. त्यामुळे या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकूणच, विधान परिषद निवडणुकीच्या निकालातून राज्यातील बदलते राजकीय समीकरण स्पष्ट होत असून महायुतीचा प्रभाव कायम असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचवेळी काही ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी विजय मिळवत राजकीय समीकरणांमध्ये नवे संकेत दिले आहेत.