विधान परिषदेत महायुती एक्सप्रेस सुसाट! 17 पैकी 16 जागांवर विजय

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
मुंबई,
Mahayuti wins 16 seats in the Legislative Council स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने जबरदस्त कामगिरी करत राज्याच्या राजकारणात आपले वर्चस्व अधोरेखित केले आहे. 17 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महायुतीने तब्बल 16 जागांवर विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला. या निकालामुळे आगामी राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक दमदार कामगिरी करत लढवलेल्या सर्व 11 जागांवर विजय मिळवला. भाजपचे अरुण लखानी, प्राजक्त तनपुरे, सुहास शिरसाट, अविनाश ब्रह्मंकर, धैर्यशील कदम, राजेंद्र राऊत, बसवराज पाटील, राजीव पोतदार, नंदकिशोर महाजन, प्रवीण पोते आणि अमर राजूरकर विजयी झाले.
 
 
 
s235
 
शिवसेनेने 4 पैकी 3 जागांवर यश
शिवसेना पक्षाचे रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी आणि सईद खान विजयी ठरले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरे आणि विक्रम काकडे यांनी विजय मिळवत पक्षाची ताकद कायम राखली. संपूर्ण निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो नाशिक मतदारसंघ. येथे महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या गोकुळ गीते यांनी धक्कादायक विजय नोंदवला. त्यांच्या विजयाने नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून हा निकाल संपूर्ण निवडणुकीतील सर्वात मोठा ट्विस्ट मानला जात आहे.
 
अनेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध विजयी झाले, तर उर्वरित जागांवर मतमोजणीनंतर महायुतीचा स्पष्ट दबदबा दिसून आला. नागपूर, भंडारा-गोंदिया, सांगली-सातारा, सोलापूर, जळगाव, अमरावती आणि नांदेडसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघांत महायुतीने मोठा विजय मिळवला. या निकालामुळे महायुतीची रणनीती, संघटनशक्ती आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळवता न आल्याने विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.