पुणे.
Monsoon arrives in Pune राज्यात पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अखेर महाराष्ट्रात पुन्हा वेग घेतला असून मान्सूनने पुण्यात अधिकृत प्रवेश केला आहे. तसेच पुढील 48 तासांत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची वाटचाल संथ झाली होती. वातावरणातील कोरडेपणा, कमी दाबाच्या प्रणालींचा अभाव आणि हवामानातील बदल यामुळे पावसाचा वेग मंदावला होता. मात्र आता हवामानात अनुकूल बदल दिसून येत असून राज्यातील अनेक भागांत पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे.

दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत मान्सून सक्रिय होत असल्याचे चित्र दिसत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे या भागांत पावसाची हालचाल वाढली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत रविवारी आणि सोमवारी सकाळी हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी उकाडा अद्याप कायम आहे. मुंबईकरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम असून मान्सूनच्या आगमनाने या प्रतीक्षेला लवकरच पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कमी पावसाचा फटका मुंबईच्या पाणीपुरवठ्यावरही बसताना दिसत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरात आधीच पाणी कपात लागू करण्यात आली असून काही व्यावसायिक आणि औद्योगिक वापरावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.आता सर्वांचे लक्ष मान्सूनच्या पुढील हालचालीकडे लागले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढू शकतो. त्यामुळे उष्णतेने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.