नागपूर,
neet-ug-re-examination : नीट-यूजी फेरपरीक्षेसाठी शहरातील विद्यार्थ्यांना वेळेत आणि सुरक्षितपणे परीक्षा केंद्रांवर पोहोचविण्याची जबाबदारी 'आपली बस'ने यशस्वीपणे पार पाडली. रविवारी राबविण्यात आलेल्या विशेष उपक्रमाअंतर्गत ६९० परीक्षार्थींना नागपूरमधील ३० परीक्षा केंद्रांवर मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
देशातील महत्त्वाच्या प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या नीट-यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणांहून विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. निश्चित 'पिक-अप पॉइंट्स'वरून विद्यार्थ्यांना वेळेआधीच परीक्षा केंद्रांवर पोहोचविण्यात आले.
समन्वयातून यशस्वी नियोजन
'आपली बस' आणि 'चलो' पथक, चालक, वाहक तसेच परिचालन कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ही सेवा सुरळीत पार पडली. वाहतूक कोंडी किंवा अन्य अडचणींमुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी दिवसभर विशेष नियोजन करण्यात आले होते.
विद्यार्थी-पालकांकडून स्वागत
मोफत आणि विश्वासार्ह वाहतूक सुविधेमुळे विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले. प्रवासाची चिंता दूर झाल्याने परीक्षार्थींना मानसिक ताण कमी झाला आणि ते आत्मविश्वासाने परीक्षा केंद्रांवर पोहोचल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
वाहतूक समितीच्या अध्यक्षा मंगला खेकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात सार्वजनिक वाहतूकही महत्त्वाची भागीदार ठरू शकते, हे या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले. नियमित सेवांपलीकडे जाऊन नागरिकांच्या गरजांना प्रतिसाद देण्याची 'आपली बस'ची भूमिका या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली.