नीट परीक्षेपूर्वी रडणाऱ्या विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

अन् ‘त्या’ विद्यार्थिनीच्या मदतीला पोलिसच आले धावून

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
NEET Exam Police Help Nagpur, नीटची फेरपरीक्षेला काही मिनिटांचा अवधी असताना एक विद्यार्थिनी परीक्षा केंद्राच्या गेटच्या बाजुला बसून रडत होती. दरम्यान एका ठाणेदाराचे वाहन तेथून जात होते. विद्यार्थिनीची विचारपूस केली असता तिने प्रवेशपत्र कलर प्रिंट नसल्याने परीक्षेला बसता येणार नसल्याचे सांगितले. ठाणेदाराने लगेच शासकीय वाहनात त्या विद्यार्थिनीला बसवले आणि ‌प्रवेशद्वार बंद होण्याच्या काही सेकंदापूर्वीच परीक्षा केंद्रावर सोडले. अशाप्रकारे त्या विद्यार्थिनीच्या अडचणीत पोलिसच धावून आले. पोलिसांच्या या कृतीमुळे पोलिस विभागाची प्रतिमा उजळली आहे.
 

NEET Exam Police Help Nagpur, 
आंचल नावाची १७ वर्षांची विद्यार्थिनीला नीट फेरपरीक्षेसाठी खापरी परीक्षा केंद्र भेटले होते. ती बसने प्रवास करीत वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहचली. मात्र, चेकिंग होत असताना तिच्याकडे कलर प्रिंट प्रवेश पत्र नव्हते. त्यामुळे तिला प्रवेशद्वारावरच रोकण्यात आले. कलर प्रिंट दाखवल्यानंतर परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल, असे बजावून तिला गेटच्या बाहेर काढण्यात आले. परीक्षा केंद्राच्या जवळपास झेरॉक्स दुकाने नसल्यामुळे त्या मुलीला दूरवर जाऊन परत परीक्षा केंद्रावर येणे शक्य नव्हते. त्यामुळे ती भेदरलेल्या अवस्थेत परीक्षा केंद्रावर कुणाच्यातरी मदतीची वाट बघत होती. अनेकांना विनवण्या केल्यानंतरही तिला कुणी मदत केली नाही. त्यामुळे परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वाराच्या काही अंतरावर रडत बसली. तेवढ्यात बेलतरोडीचे ठाणेदार रितेश अहेर हे पीटर व्हॅनने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यांनी ती मुलगी रडताना दिसली. तिची आस्थेने विचारपूस केली. ‘सर... माझ्याकडे प्रवेशपत्र कलर प्रिंट नसल्याने परीक्षेला बसू देणार नाहीत. त्यामुळे माझे डॉक्टर व्होण्याचे स्वप्न अपूर्ण राहणार आहे’ असे सांगताच उच्च शिक्षित असलेल्या अहेर यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून मुलीला थेट शासकीय वाहनात बसवले. लगेच एक झेरॉक्स दुकानातून लगेच कलर प्रिंट काढून दिली. प्रवेशद्वार बंद होण्याच्या काही सेकंदापूर्वीच तिला परीक्षा केंद्रावर सोडले. पोलिसांच्या या सकारात्मक कृतीमुळे त्या विद्यार्थिनीला परीक्षा देता आली. या कृतीचे पोलिसांची प्रतिमा आणखी उजळली. ही घटना वरिष्ठांच्या कानावर पोहचताच त्यांनीसुद्धा ठाणेदार अहेर यांचे कौतूक केले.
थँक यू पोलिस काका....
सुरुवातीला भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या आचलच्या मनात हूरहूर होती. परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशिर झाल्यास परीक्षा देता येणार नाही, त्यामुळे वर्ष वाया जाणार, अशी भीती होती. मात्र, काही सेकंदापूर्वीच प्रवेशद्वारावर पोहचविल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. लोखंडी गेटच्या एका रॉडच्या रिकाम्या जागेतून आचलने हात बाहेर काढला.‘थँक यू पोलिस काका...’ असे म्हणून सुवदनावर स्मित हास्य देऊन लगबगीने परीक्षेसाठी निघाली.
 
 

चौघांना दिले पासपोर्ट फोटो काढून
 
 
खापरी परीक्षा केंद्रावर एक नव्हे दोन नव्हे तर चार विद्यार्थ्यांकडे पासपोर्ट फोटो नव्हते. परीक्षा सुरु होण्यास काही मिनिटांचा अवधी बाकी होता. त्यांनी ठाणेदार रितेश अहेर यांना समस्या सांगितली. त्यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याला फोटो स्टुडिओमध्ये पाठवले. त्यानंत मुलांचे मोबाईलने फोटो काढून कर्मचाऱ्याला व्हॉट्सअप केले. स्टुडिओतून फोटो काढून कर्मचारी धावपळ करीत परीक्षा केंद्रावर पोहचला. अशाप्रकारे चारही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवेश मिळाला.