मुंबई,
Norwegians are aggressive over Jadhav's ठाकरे गटात आधीच सहा खासदारांच्या नाराजीमुळे निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेत आता आणखी एका अंतर्गत वादाची भर पडल्याचे दिसत आहे. पक्षातील दोन वरिष्ठ नेते भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातील मतभेद आता उघडपणे समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हा संपूर्ण प्रकार शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यादरम्यान घडल्याचे समोर आले आहे. माटुंगा येथील षणमुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमासाठी नेत्यांची ये-जा सुरू असताना भास्कर जाधव प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी सभागृहाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.

भास्कर जाधव माध्यमांशी बोलत असतानाच मागून मिलिंद नार्वेकर यांची गाडी आली. गर्दी आणि गोंधळामुळे मार्ग मोकळा नसल्याने चालकाने हॉर्न वाजवला. त्यानंतर भास्कर जाधव बाजूला झाले. मात्र, संबंधित गाडी मिलिंद नार्वेकर यांची असल्याचे लक्षात येताच त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे व्हिडीओमध्ये दिसून आले.यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत अप्रत्यक्षपणे भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या पोस्टमधील टोलेबाजीमुळे हा वाद अधिकच चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. या घडामोडींमुळे ठाकरे गटातील नाराजी आणि अंतर्गत संघर्षाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. आगामी काळात पक्ष नेतृत्व या वादावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.