अनिल कांबळे,
नागपूर,
criminal-murdered-in-lakadganj : लकडगंजमधील कुख्यात गुन्हेगाराचा काही आरोपींनी धारदार शस्त्रांनी भोसकून खून केला. ही घटना आज सोमवारी पहाटेच्या सुमारास मालधक्का परिसरात उघडकीस आली. अब्दुल रहीम उर्फ रम्मू (वय ३८, रा. शांतीनगर) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. या हत्याकांडाच्या चार तासांतच पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले.
प्राप्त माहितीनुसार, माहितीनुसार, इतवारी रेल्वे स्टेशनजवळील मालधक्का परिसरातील एका निर्जन ठिकाणी एक मृतदेह डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने गंभीर जखमा झालेल्या अवस्थेत सापडला. नागरिकांनी याबाबत लकडगंज पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार मुकुंद कवाडे यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून पथकाच्या माध्यमातून पंचनामा केला. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सुमारे ५० ते ६० मजूर आणि स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर पोलिस आयुक्तालयाच्या अत्याधुनिक ‘सीम्बा’ (स्मार्ट इन्व्हेस्टिगेशन मॅनेजमेंट बेस्ड अॅप्लिकेशन) या अॅपचा वापर केला. मृतकाचा फोटो अॅपमध्ये अपलोड करताच, त्याची ओळख अब्दुल रहीम उर्फ रम्मू अशी पटली. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांना बोलावून ओळख निश्चित केली.
चार तासांत तीन आरोपी ताब्यात
तपासादरम्यान नातेवाईकांनी दिलेल्या संशयावरून लकडगंज पोलिस आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक ३ च्या पथकाने संयुक्त कारवाई करत अवघ्या एका तासाच्या आत आरोपी परशेवर उर्फ ईश्वर उर्फ पेलू उर्फ पप्पू, संतोष पटेल आणि त्यांच्या एका अल्पवयीन सहकाऱ्याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांचा खबरी असल्याचा संशय
रम्मू आणि आरोपी एकमेकांचे मित्र होते. आरोपी व रम्मू हे एकमेकांच्या परिचयाचे असून चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांत सहभागी होते. यादरम्यान, रम्मू याचे पोलिस ठाण्यात येणे-जाणे वाढले होते. त्यावरुन रम्मू हा आरोपींच्या हालचालींची माहिती पोलिसांना पुरवत असल्याचा संशय आरोपींना होता. याच रागातून त्यांनी कट रचून अब्दुल रहीमला मालधक्का परिसरात नेले आणि धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला, अशी माहिती समोर आली.