प्रवीण पोटे यांचा विक्रमी मतांनी विजय

काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणात फुटली विधान परिषदेची अमरावती निवडणूक प्रवीण पोटे यांची विजयाची हॅट्रिक

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
अमरावती,
Pravin Pote wins by a record विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचे प्रवीण पोटे यांचा विक्रमी ३९० मते घेऊन विजयी झाले. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांचा पराभव केला असून त्यांना ३१ मते मिळाली. काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांना एकही मत मिळाले नाही. प्रवीण पोटे यांनी विजयाची हॅट्रिक केली. मतमोजणी सोमवारी सकाळी ८ वाजता सुरु झाली. सर्व प्रथम वैध व अवैध मतांची छाननी करण्यात आली. त्यात ४२७ एकूण मतपत्रिकापैकी ६ मतपत्रिका अवैध आढळल्या. त्यातील ५ मतपत्रिका कोऱ्या तर अन्य १ मतपत्रिकेवर खूण आढळल्याने त्या बाजूला करण्यात आल्या. ४२१ वैध मतांच्या निम्म्या पेक्षा एक जास्त म्हणजे २११ विजयाचा कोटा निश्चित करण्यात आल्यावर प्रत्यक्ष मतांची मोजणी सुरु झाली. पहिल्या पसंतीची ३९० मते घेऊन प्रवीण पोटे विजयी झाले. वंचितच्या निलेश विश्वकर्मा यांना पहिल्या पसंतीची ३१ मते मिळाली. काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांना एकही मत मिळाले नाही.
 
 

pote 
 
सदर निवडणुकीसाठी गुरुवारी ९४.६८ टक्के मतदान झाले होते. निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसचे हर्षजित देशमुख, भाजपाचे प्रवीण पोटे व वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा होते. यापैकी काँग्रेसच्या हर्षजित यांनी प्रकृतीच्या कारणावरून निवडणुकीतून एक प्रकारे माघारच घेतली होती. त्यावरून काँग्रेसमध्ये मोठा अंतर्गत कलह झाला होता. काँग्रेसने तटस्थ राहण्याचे निर्देश आपल्या मतदारांना दिले होते. जिल्ह्यात काँग्रेसची जवळपास १२० मते होती. त्यापैकी २४ जणांनी मतदान केले नव्हते. उर्वरितांनी तटस्थतेचा आदेश असताना मतदान केले. त्यांनी मतपत्रिकेवर नाव असलेल्या काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांना मत दिले नाही हे निकालावरून स्पष्ट झाले. याचाच अर्थ काँग्रेसची मते भाजपाला मिळाली. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
 
 
वंचितची मते 7, मिळाली 31
अमरावती जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची एकूण सात मते होती. असे असतानाही निलेश विश्वकर्मा यांना 31 मते मिळाली. त्यांना मिळालेली जास्तीची मते कोणाची यावर आता चर्चा सुरू झाली आहे. भाजपा उमेदवार प्रवीण पोटे यांच्यावर नाराज असलेल्या मतदारांची ती मते आहे, असे मानले जात आहे