गोंदिया,
private-bus-accident : प्रवासी बसचा पुढील टायर अचानक फुटल्याने बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून बस विरूद्ध दिशेच्या रस्त्याच्या कडेवरील झाडाला धडकली. ही घटना मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील देवरी तालुक्यातील मुरदोली परिसरात रविवारी 21 जून सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र, एक प्रवासी जखमी तर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

खासगी ट्रॅव्हल्स 40 प्रवाशांना घेऊन रायपूरकडून सोलापूरच्या दिशेने जात असताना मुरदोली गावाजवळ महामार्गावर अचानक बसचा समोरील टायर फुटला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या कडेवरील झाडावर जाऊन धडकली. झाडाला झालेली धडक इतकी भीषण होती की बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहाणी झाली नाही. मात्र, बसमधील अर्शद राशिद अहमद रा. भिलाई (छ.ग.) हा तरुण जखमी झाला. तर काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. सर्व जखमींना रुग्णवाहिकेद्वारे देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचेवर उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच देवरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. पुढील तपास देवरी पोलिस करीत आहेत.