चंद्रपूर,
rescue-of-cattle : पोलिसांनी एका पिकअप वाहनातून अवैधरित्या कत्तलीसाठी नेत असलेल्या 12 गोवंशांची सुटका केली असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 7 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार, 22 जून रोजी करण्यात आली.
गडचांदूर-आदिलाबाद मार्गावरून एका पिकअप वाहनाद्वारे गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतूक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे तात्काळ गडचांदूर-कोरपना मार्गावरील आसन बसस्थानक परिसरात नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान, तेथे आलेल्या एक पिकअप वाहनाला (एमएच 32 एजे 6471) अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये 12 जिवंत गाई आढळून आल्या. या जनावरांना अत्यंत निर्दयतेने कोंबून कोणतीही चारापाणीची व्यवस्था न करता वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी वाहनातील व्यक्तीकडे पशुवैद्यकीय प्रमाणपत्र, जनावरांच्या खरेदी-विक्रीच्या पावत्या व इतर आवश्यक कागदपत्रांची मागणी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. पुढील चौकशीत संबंधित जनावरे कत्तलीसाठी बाहेरगावी नेत असल्याची कबुली मिळाली.
या कारवाईत 2 लाख 40 हजार रुपये किंमतीची जनावरे, 5 लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण 7 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संतोष रामाजी परचाके (35, रा. कळंब हळदीपुरा, ता. जि. यवतमाळ) याला ताब्यात घेण्यात आले असून, फरार चालक पंकज बोटराव (रा. यवतमाळ), याचा शोध सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, गडचांदूर परिक्षेत्राचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात गडचांदूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक सुखदेव गोदे आदींनी केली.