कारंजा लाड,
self-immolation-with-family : तालुक्यातील मेहा येथील कडू कुटुंबाने वंशपरंपरागत नैसर्गिक नाल्याचा प्रवाह रोखणे, महसूल अधिकार्यांचा कथित चुकीचा अहवाल आणि त्यातून झालेल्या शेतीच्या नुकसानामुळे आपल्या कुटुंबावर गंभीर संकट ओढवले असल्याचा आरोप करून मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकार्यांकडे निवेदन सादर केले आहे. या प्रकरणामुळे मानसिक, आर्थिक व सामाजिक ताण निर्माण होऊन आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचा गंभीर दावा कुटुंबाने केला आहे.

निवेदनानुसार, अर्जदार भास्कर विनायक कडू, त्यांची सून अनुराधा प्रफुल्ल कडू आणि पत्नी ललिता भास्कर कडू, रा. मेहा, ता. कारंजा यांनी एकत्रितपणे प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. त्यांच्या शेतालगत अनेक वर्षांपासून असलेल्या नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलण्यात आला. त्यामुळे पावसाचे पाणी नदीकडे न जाता त्यांच्या शेतात साचू लागले. परिणामी शेतीचे नुकसान झाले आणि कुटुंबाच्या पारंपरिक उपजीविकेवर मोठा परिणाम झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनात पुढे असा आरोप करण्यात आला आहे की, तलाठी व मंडळ अधिकार्यांच्या कथित चुकीच्या स्थळ निरीक्षण अहवालामुळे तहसील स्तरावर चुकीचा आदेश झाला.
संबंधित गैरअर्जदार आणि अधिकार्यांच्या संगनमतामुळे हे प्रकरण गंभीर बनल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व परिस्थितीत वाढलेला मानसिक तणाव, शेतीतील अडचणी आणि आर्थिक संकटामुळे प्रफुल्ल भास्कर कडू यांनी शेतात फाशी घेऊन आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी केला आहे. कुटुंबाने प्रशासनाकडे मागणी केली आहे की, नव्याने उपविभागीय अधिकार्यांमार्फत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात यावी, पूर्वीचे निरीक्षण व आदेशांची चौकशी व्हावी आणि सत्य परिस्थिती लक्षात घेऊन नवीन आदेश द्यावेत. पावसाळा सुरू झाल्याने तातडीने निर्णय घेण्याची विनंतीही करण्यात आली आहे. अर्ज दिल्यानंतर सात दिवसांच्या आत न्याय न मिळाल्यास मुख्यमंत्री निवासासमोर कुटुंबीयांसह आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा इशाराही त्यांनी शेवटी दिला आहे.