शिरपूर जैन,
shirpur-gram-panchayat-election : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक म्हणून ओळख असलेल्या शिरपूर ग्रामपंचायतीत एकूण १७ सदस्यांची निवड होणार असून, त्यापैकी ९ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
संभाव्य ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरपूर जैन येथील ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत विस्तार अधिकारी एस. एन. खंडारे, ग्रामपंचायत अधिकारी काकडे, तलाठी जी. एस. गवळी व भुरकाडे यांच्या उपस्थितीत वॉर्डनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सदस्य पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक म्हणून ओळख असलेल्या शिरपूर ग्रामपंचायतीत एकूण १७ सदस्यांची निवड होणार असून, त्यापैकी ९ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. यापूर्वी सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. सोडतीनुसार वॉर्ड क्रमांक १ मधील तीन जागांपैकी एक ओबीसी महिला, एक सर्वसाधारण व एक सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षित आहे. वॉर्ड क्रमांक २ मध्ये अनुसूचित जाती, सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला असे आरक्षण राहणार आहे. वॉर्ड क्रमांक ३ मध्ये अनुसूचित जाती महिला, ओबीसी व सर्वसाधारण महिला यांच्यासाठी जागा राखीव आहेत. वॉर्ड क्रमांक ४ मधील दोन जागांमध्ये ओबीसी महिला व सर्वसाधारण प्रवर्गाचा समावेश आहे.
तसेच वॉर्ड क्रमांक ५ मधील तीन जागांपैकी एक ओबीसी व दोन सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत. वॉर्ड क्रमांक ६ मधील तीन जागांमध्ये दोन सर्वसाधारण व एक सर्वसाधारण महिला जागेचा समावेश आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवारांमध्ये इच्छुक निवडणुकीची उत्सुकता वाढली असून, राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. यावेळी उपसरपंच असलम परसुवाले, गणेश अंभोरे, संतोष भालेराव, बाळासाहेब देशमुख, पंकज देशमुख, दस्तगीर पैलवान, गजानन इरतकर, दिलीप विश्वंभर, प्रकाश अंभोरे, मोहीबखा पठाण, मुक्तारखा पठाण, फारुख राज, शशिकांत देशमुख, उमेश बोराटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.