मान्सुनपूर्व कपाशीला तुषार सिंचनाचा आधार!

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
मानोरा, 
sprinkler-irrigation : तालुक्यात यंदा मान्सुनचे आगमन अपेक्षेपेक्षा उशिरा झाल्याने बागायतदार शेतकर्‍यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. मान्सूनपूर्व मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिकाला जीवनदान देण्यासाठी शेतकरी तुषार सिंचनाचा आधार घेत असून दिवस-रात्र शेतात राबत असल्याचे चित्र सध्या परिसरात पाहावयास मिळत आहे.
 
 
 
K
 
 
 
खरीप हंगामाच्या पेरणीची वेळ आल्यामुळे अनेक ओलिताखाली शेती असलेल्या शेतकर्‍यांनी मान्सुनपूर्व कपाशीची लागवड केली आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने जमिनीतील उष्णतेने पावसाअभावी संकट ओढवले आहे. पावसाची दांडी आणि वारंवार विज गुलमुळे कोवळ्या कपाशी रोपांवर करपण्याची व कोमेजण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत विहीर व बोरवेलचे पाणी उपलब्ध असलेल्या बागायतदार शेतकर्‍यांनी तुषार सिंचनाचा मार्ग अवलंबला आहे. पिकांच्या मुळाशी आवश्यक ओलावा कायम राहावा, वाढ खुंटू नये आणि उगवण टिकून राहावी यासाठी शेतकरी अतिरिक्त खर्च करून सिंचन करत आहेत. मात्र, वाढले वीजबिल, पाण्याची मर्यादित उपलब्धता आणि सिंचनासाठी लागणारा अतिरिक्त वेळ यामुळे शेतकर्‍यांची मोठी कसरत सुरू आहे.
 
 
कृषी क्षेत्रातील जाणकारांच्या मते येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यास कपाशी पिकाला मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र, पावसाचा आणखी विलंब झाल्यास सिंचनावरील खर्च वाढून उत्पादन खर्चात मोठी भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या तरी तुषार सिंचन आणि पावसाची प्रतीक्षा या दुहेरी आव्हानांचा सामना करत शेतकरी कपाशी वाचविण्यासाठी झटताना दिसत आहेत.
 
 
आसोला खुर्द परिसरातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात मान्सुनपूर्व कपाशीची लागवड केली आहे. मात्र, पावसाने उशीर केल्याने शेतकर्‍यांना तुषार सिंचनाचा आधार घ्यावा लागत आहे. आगामी काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास पिकांना संजीवनी मिळेल.
आनंदराव देशमुख शेतकरी गव्हा
 
 
यंदा मान्सुन उशिरा दाखल होत असल्याने मान्सूनपूर्व लागवड केलेल्या कपाशी पिकास तुषार सिंचनाद्वारे पाणी द्यावे लागत आहे. पिकाची वाढ चांगली राहावी आणि उगवण टिकून राहावी यासाठी अतिरिक्त खर्च करून सिंचन करावे लागत आहे. पण विजेच्या लपंडावाने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
सुनील राठोड शेतकरी आसोला खुर्द