तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
student-drowns : शहरातील एका नामांकित विद्यालयाच्या एका 14 वर्षीय विद्यार्थ्याचा डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवार, 21 जून रोजी आर्णी मार्गावरील रेल्वेचे काम सुरू असलेल्या ठिकाणी घडली. थायलेश चंद्रमणी मेश्राम (वय 14, यरद शरद) असे मृत पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे मेश्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
यवतमाळ शहरातील लोकनायक बापूजी अणे विद्यालयातील 10 ते 12 विद्यार्थी समर्थवाडी येथील एका शिकवणी वर्गात जातात. शनिवार, 20 जून रोजी या विद्यार्थ्यांनी शिक्षक मयूर यांच्यासोबत रविवारी कुठेतरी बाहेर जाऊन डबापार्टी करण्याचे ठरवले.
त्यानुसार रविवारी सकाळी 10.30 ते 11 च्या सुमारास हे सर्व विद्यार्थी आर्णी मार्गावरील मॉल परिसरात पोहोचले. सर्वजण जेवणाची तयारी करत असताना थायलेश जवळच असलेल्या एका डोहात पोहण्यासाठी उतरला. मात्र पाण्याचा व खोलीचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला.
थायलेश पाण्यात बुडत असल्याचे पाहताच इतर विद्यार्थ्यांनी एकच आरडाओरडा केला. यावेळी उपस्थित असलेले शिक्षक मयूर यांनी तत्काळ दोरीच्या सहायाने त्याला डोहात शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. या घटनेची माहिती अवधूतवाडी पोलिस व आपत्ती व्यवस्थापन पथकाला देण्यात आली.
माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली व रीतसर पंचनामा केला. त्यानंतर थायलेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.