अनिल कांबळे
नागपूर,
Tadoba ताडोबा येथील रिसॉर्टमध्ये गुंतवणूक केल्यास कोट्यवधी रुपयांचा नफा मिळेल, असे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी बाप-लेकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
रामदासपेठ येथील व्यावसायिक प्रकाश गोविंदलाल अग्रवाल (वय ६६) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, नागपूर येथील ऋषिकेश वाचासुंदर आणि त्याचे वडील सत्यजित वाचासुंदर यांनी ताडोबा येथील त्यांच्या रिसॉर्ट प्रकल्पात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले होते. पर्यटन व्यवसायातून मोठा नफा मिळणार असल्याचे सांगून त्यांनी अग्रवाल यांचा विश्वास संपादन केला. वर्ष २०१७ ते २०१८ दरम्यान एका परिचितामार्फत अग्रवाल यांची आरोपी बाप-लेकांशी ओळख झाली होती. त्यानंतर आरोपींनी ताडोबा येथील रिसॉर्टमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल, असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर Tadoba विश्वास ठेवून अग्रवाल यांनी टप्प्याटप्प्याने तब्बल २ कोटी ५१ लाख रुपये गुंतविले. मात्र, एवढी मोठी गुंतवणूक करूनही त्यांना कोणताही आर्थिक लाभ मिळाला नाही. उलट आरोपींकडून सातत्याने टाळाटाळ केली जात असल्याने अग्रवाल यांना फसवणुकीचा संशय आला. त्यांनी गुंतवलेली रक्कम परत मागितल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला.
तक्रारीनुसार, वाढत्या दबावामुळे Tadoba आरोपींनी गुंतवणुकीतील सुमारे १ कोटी ५१ लाख रुपये परत केले. मात्र उर्वरित रक्कम परत करण्याबाबत त्यांनी टाळाटाळ सुरूच ठेवली. गेल्या अनेक वर्षांपासून आरोपींनी त्यांच्या पैशाचा वापर केला असल्याने मूळ रक्कम व व्याजासह सुमारे २ कोटी रुपये अद्याप येणे असल्याचा दावा अग्रवाल यांनी केला आहे. या तक्रारीच्या आधारे बजाजनगर पोलिसांनी शनिवारी आरोपी ऋषिकेश वाचासुंदर आणि सत्यजित वाचासुंदर यांच्याविरुद्ध फसवणुकीसह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे आणि इतर पुरावे तपासले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.