अग्रलेख...
Tariq Rahman देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सरकारला जनतेने सत्तेवरून हाकलून लावल्यानंतर पूर्वोत्तर भारतातील परिस्थितीत झपाट्याने बदल होतो आहे. म्यानमारमधील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांचे व्दार असलेल्या पश्चिम बंगालच्या सीमा संरक्षणाच्या दृष्टीने बंदिस्त करण्यात येत असल्याने आपला शेजारी बांगलादेशच्या पोटात दुखू लागले आहे. बांगलादेशात सध्या सत्तेवर भारतविरोधी धोरण असलेल्या पक्षाचे सरकार आहे. परिणामी भारताच्या शत्रूला हाताशी धरून कुरापती करण्याचा डाव बांगलादेशने आखला आहे. या देशाचे पंतप्रधान तारिक रहमान सोमवारी चीनच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात दोन्ही देश १२-१३ करारांवर स्वाक्षरी करणार आहेत.
यामध्ये महत्वाचा मुद्दा असेल तो तिस्ता नदी जलवाटपाचा. गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा कायम आहे. शेजारी देशांमध्ये वाद असणे नवीन नाही. पाकिस्तान, चीन, नेपाळ, म्यानमार, बांगलादेश आणि श्रीलंका हे देश सातत्याने भारताच्या विरोधात कुरापती काढत असतात. मोठा भाऊ या नात्याने भारताने कधीही शेजारी देशांसोबत वाद निर्माण होतील, असे पाऊल उचलले नाही. पण, भारताच्या आतापर्यंतच्या शांततापूर्ण, सहिष्णू धोरणाचा फायदा हे शेजारी सतत उचलत आले आहेत. शेख हसिना वाजेद यांना २०२४ मध्ये एका सुनियोजित कटाच्या माध्यमातून सत्तेवरून खाली खेचण्यात आले. भारताचा हस्तक्षेप म्हणा की दबाव म्हणा वा आणखी काही, शेख हसिना कुटुंबासहित सुखरुप आहेत. अन्यथा, त्यांचे वडील शेख मुजीबूर रहमान यांची त्यांच्या कुटुंबीयांसहीत ज्या प्रकारे हत्या करण्यात आली होती, तसाच प्रकार शेख हसीना यांच्याबाबतीत घडणे अशक्य नव्हते. बांगलादेशचा जन्म भारतामुळे झाला आहे. तरीही बांगलादेशच्या भारतविरोधी म्होरक्यांना भारताच्या उपकाराचे भान राहत नाही. आता पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर तारिक यांनी आपल्या पहिल्या विदेश दौऱ्यासाठी मलेशिया या मुस्लिम देशाची निवड केली. हा दौरा आटोपल्यानंतर ते चीनला जात आहेत. वास्तविक पाहता बांगलादेशला सर्वांत जास्त सहकार्य आणि मदत भारताने केली आहे. चीन आणि मलेशिया हे तसे भौगोलिक अंतराचा विचार केल्यास दूरचे देश. तरीही सुरुवातीच्या दौऱ्यांसाठी मलेशियाची निवड ही मुस्लिम देश, या नात्याने केली असावी तर चीन भेट ही भारतावर दबाव टाकण्यासाठी केली असावी अशी शंका घेण्यास वाव आहे. बांगलादेशवर किंवा अन्य कोणत्याही शेजारच्या राष्ट्रावर नैसर्गिक संकट आले की सर्वप्रथम भारतच मदतीला धावून जातो, हा इतिहास आहे. पण, शेजारी देशांना याचा विसर पडतो. पहिल्या अधिकृत दौऱ्यासाठी मलेशियाची निवड करणे, हा रहमान यांचा नाईलाज असेलही. पण, त्यातून चांगला संदेश जात नाही. मलेशियात लाखोंच्या संख्येने बांगलादेशी कामासाठी जातात. कधीकाळी भारत हा त्यांच्यासाठी हक्काचा देश होता. सीमा ओलांडून विनासायास ते भारतात येऊ शकत होते. पण, आता परिस्थिती बदलली आहे. युरोपीयन देशांनीही आता मुस्लिम देशांतील नागरिकांना प्रवेश देण्यासाठीचे नियम कठोर करण्यास प्रारंभ केला आहे. मध्यंतरीच्या काळात बांगलादेशचे अर्थकारण सुधारत होते. ते आता एकदम माघारले आहे. अंतर्गत परिस्थिती नाजूक आणि अस्थिर असल्याने बांगलादेशात पाश्चात्य देश गुंतवणूक करण्यास इच्छूक नाहीत. बांगलादेशच्या परकीय गंगाजळीत डॅालर्स ओतण्याचे काम परदेशात काम करणारे बांगलादेशी कामगार करीत असतात. आज पूर्वोत्तर आशियाई देशांमध्ये तेथील लक्षावधी कामगार काम करीत आहेत.
सर्वाधिक आठ लाख कामगार मलेशियात आहेत. कामगारांच्या मुद्यावरून दोन्ही देशांच्या संबंधात सध्या तणाव आहे. मलेशियातील नोकर भरती प्रक्रियेत गैरप्रकार करून बांगलादेशी कामगार नोकरी मिळवितात, असा मलेशियाचा आरोप आहे. याच मुद्यावरून मलेशियाने जून २०२४ पासून बांगलादेशी स्थलांतरित कामगारांवर बंदी घातली आहे. ही बंदी उठवावी आणि कामगारांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि मलेशियन कंपन्यांनी बांगलादेशात गुंतवणूक करावी, या उद्देशाने रहमान यांनी सुरुवातीला मलेशियाला प्राधान्य दिले, असे म्हणता येईल. पण, त्यांचे चीनला जाणे इतके सहजतेने घेण्याजोगे नाही. बांगलादेशात जेव्हा-जेव्हा कट्टरवादी आणि भारतविरोधी सरकार सत्तेवर आले, तेव्हा-तेव्हा अडचणी निर्माण झाल्या हा इतिहास आहे. तारिक रहमान गेल्या जानेवारी महिन्यात पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भारतभेटीचे आमंत्रण दिले होते. त्यानंतर चीननेही त्यांना बीजिंग दौऱ्याचे निमंत्रण पाठविले. रहमान यांनी पहिल्या विदेश दौऱ्यासाठी भारत- चीनऐवजी मलेशियाची निवड केली. तारिक रहमान यांच्या पक्षाचा भारतविरोधी इतिहास पाहता त्यांनी मलेशियानंतर चीनला प्राधान्य दिले हे समजून घेतले पाहिजे. भारतासोबतचे संबंध बिघडल्यानंतर बांगलादेशचे उद्योग संकटात सापडले. कापड उद्योग बंद पडण्याच्या स्थितीत आला. परकीय गंगाजळी मृतावस्थेत आल्याने या देशाला आता चीनची गरज भासू लागली आहे. शेख हसीना वाजेद यांचे सरकार गेल्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्त्वातील हंगामी सरकारने भारताला बाजूला ठेवून चीनसोबत जवळीक वाढविली. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात चीनने प्रचंड पैसा ओतला आहे. अर्थात हा सारा पैसा कर्जाच्या रुपाने दिला गेलेला आहे. या सर्व घडामोडींकडे भारत बारीक नजर ठेवून आहे. शेजारी देशांनी चीनसोबत कितीही जवळीक साधली तरी आर्थिक आणि भू-राजकीयदृष्ट्या याचे काहीच परिणाम होणार नाही, अशा मजबूत स्थितीत आज भारत आहे.
Tariq Rahman कोरोनानंतरची आर्थिक परिस्थिती, युक्रेन-रशिया युद्ध, वर्तमानातील अमेरिका-इराण संघर्ष, या सर्व जागतिक संकट काळातील परिस्थिती ज्या कौशल्याने हाताळली, ते पाहता शेजारी देशांमध्ये घडत असलेल्या कोणत्याही घटनांचा भारतावर आता फार परिणाम होणार नाही. तरीही शेजारी कुरापत करीत असेल तर लक्ष ठेवावे लागतेच. तारिक यांच्या भेटीत चीनसोबत १३ करार होणार आहेत, अशी माहिती बांगलादेशचे परराष्ट्र सचिव असीम आलम सियाम यांनी दिली आहे. चीनसोबत तिस्ता प्रकल्पावरही चर्चा होणार असल्याचे सियाम म्हणाले. समजून घ्यायचे ते हे की, तिस्ता नदीचा प्रश्न भारत, बांगलादेश आणि चीन या तिन्ही देशांच्या भू-राजकीय हितसंबंधांशी जोडलेला आहे. भारताच्या ईशान्येकडील राज्यांसाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या या परिसरात चीनचा वाढता हस्तक्षेप भविष्यात चिंतेचा विषय ठरू शकतो. चीनची नीती ही कधीच केवळ व्यापार आणि गुंतवणुकीपुरती मर्यादित नसते. तो आर्थिक मदतीच्या माध्यमातून संबंधित देशांच्या धोरणांवर प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, हे श्रीलंकेतील हंबनटोटा बंदराच्या अनुभवातून जगाने पाहिले आहे. नेपाळ, मालदीव आणि पाकिस्तानमध्येही चीनने अशाच प्रकारे आपले आर्थिक आणि सामरिक हितसंबंध विस्तारले आहेत. कोणताही देश आपल्या राष्ट्रीय हितासाठी परराष्ट्र धोरण आखतो, हे स्वाभाविक आहे. परंतु भारताशी शत्रुत्व निर्माण करून चीनच्या छत्रछायेखाली जाणे, हा कोणत्याही दक्षिण आशियाई देशासाठी दीर्घकालीन लाभाचा व्यवहार ठरलेला नाही. पाकिस्तानचे उदाहरण त्यासाठी पुरेसे आहे. चीनकडून अब्जावधी डॉलर्सची मदत मिळूनही पाकिस्तानची अर्थव्यवस्था आज गंभीर संकटात सापडलेली आहे. कर्जाचा डोंगर वाढला असून आर्थिक स्वातंत्र्यावर मर्यादा येत आहेत. दक्षिण आशियातील स्थैर्य आणि शांततेसाठी बांगलादेशने वास्तवाचे भान ठेवणे आवश्यक आहे. १९७१ च्या इतिहासाची आठवण करून देण्याची वेळ भारतावर येऊ नये. पण, सध्या तरी बांगलादेशला तिरकी चाल आवडू लागली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकांत भारताने पाकिस्तानच्या वैरभावाचा, चीनच्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षांचा, नेपाळच्या राजकीय अस्थिरतेचा, श्रीलंकेच्या बदलत्या भूमिकेचा आणि आता बांगलादेशातील वाढत्या भारतविरोधी प्रवाहांचा सामना केला आहे. भारताच्या वाट्याला सतत काटेरी शेजारीच आले. पण, त्यात भारताचे काही बिघडले नाही, उलट ज्यांनी काटे पेरले, त्यांचेच बिघडले, एवढे तरी बांगलादेशने लक्षात ठेवावे.