विजय प्रवीण पोटेंचा, जल्लोष महायुतीचा

ढोलताशांचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
अमरावती, 
pravin-pote : महायुतीचे भाजपा उमेदवार प्रवीण पोटे यांचा विधान परिषद निवडणुकीत विक्रमी मतांनी विजय झाल्यानंतर महायुतीत सहभागी सर्व पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत पोटे यांचे अभिनंदन केले.
 
 
 JK
 
 
विजयाचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर प्रवीण पोटे थेट भाजपाचे जेष्ठ नेते अरूण अडसड यांचे आशिर्वाद घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. तेथे त्यांचा सत्कार झाला. यावेळी आ. प्रताप अडसड यांच्या मातोश्री प्रतिभा अडसड, धाणगावच्या नगराध्यक्ष अर्चना रोठे - अडसड व अन्य कुटुंबीय उपस्थित होते. त्यानंतर पोटे स्वत:च्या घरी केले. तेथे त्यांच्या पत्नी अनुराधा यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी मुलगा श्रेयस व मुलगी श्रुती उपस्थित होती. तेथून पोटे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात दाखल झाले. येथे त्यांचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, युवा स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. तसेच क्रेडाईसह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सलग ढोलताशांचा निनाद सुरू होता.
 
 
प्रत्येक व्यक्ती पोटे यांना पेढा भरवून त्यांचे अभिनंदन करता होता. त्यांच्या कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते. दरम्यानच्याच काळात शहरभर त्यांच्या अभिनंदनाचे होर्डिंग लागले होते. जनसंपर्क कार्यालयातून निघाल्यावर पोट यांनी इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर ते थेट राजापेठ स्थित भाजपा कार्यालयात आले. तेथेही त्यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. जवळपास सर्वच ठिकाणी भाजपा नेते प्रा. दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर, रवींद्र खांडेकर, किरण पातुरकर, तुषार भारतीय, महापौर श्रीचंद तेजवानी, गटनेता चेतन गांवडे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे : पोटे
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला काँग्रेसचा विरोध असल्यानेच त्यांनी त्यांनी आपल्या मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा व्हीप काढला. मुळात हे चुकीचे होते. पण, तो व्हीप झुगारून बहुतांश काँग्रेस मतदारांनी मतदान केले. काँग्रेसकडे काहीच नियोजन नव्हते. मागच्या निवडणुकीतूनही त्यांनी काहीच बोध घेतला नाही. याचाच अर्थ काँग्रेसवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. माझे नगरसेवकांशी सुरूवातीपासूनच कौटुंबिक संबंध आहे. त्यामुळेच २०१२, २०१८ आणि आता २०२६ या तिन्ही निवडणुकांमध्ये मला सर्वपक्षीय नगरसेवकांची मते मिळाली. त्यांच्या कामाला मी नेहमीच प्राधान्य देत असल्याने त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. वंचितच्या उमेदवार जास्तीची मिळालेली २७ मते कोणाची हा संशोधनाचा विषय आहे. अमरावती जिल्ह्याच्या विकासाला माझे नेहमीच प्राधान्य राहीले. २०१४ ते १९ दरम्यान मी मंत्री असताना २५ हजार कोटीचा निधी आणला. भाजपाच्याच काळात अमरावतीला सर्वाधीक निधी मिळाला. येत्या काळात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात आणखी निधी खेचून आणणार असल्याची प्रतिक्रीया नवनिर्वाचीत आमदार प्रवीण पोटे यांनी दिली.