वणी पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई

-20.13 लाखांचा मुद्देमाल जप्त -तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :22-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी, 
illegal-liquor-transport : वणी पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत दोन वाहनांसह 20 लाख 13 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई सोमवार, 22 जूनला सकाळी करण्यात आली.
 
 
y22Jun-Aaropi
 
ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या आदेशांनुसार पोलिस पथक दीपक चौपाटी परिसरात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी गस्त घालत होते. यावेळी याच परिसरातून एका चारचाकी वाहनातून, तसेच एका मोपेडवरून अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.
 
 
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून घुग्गुस रोडवर संशयित काळ्या रंगाची चारचाकी अडवली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विविध कंपन्यांची 27 हजार 730 रुपयांची दारू आढळून आली. वाहनचालक भारत प्रमोद टोंगे याला ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेल्या वाहनाची किंमत सुमारे 19 लाख रुपये आहे.
 
 
यानंतर काही वेळातच दीपक चौपाटी ते पटवारी कॉलनी मार्गावर संशयास्पदरीत्या जात असलेली एक दुचाकी मोपेड पोलिसांनी अडवली. या वाहनावर सुमित उद्धव झुंगे (वय 19) व शुभम अनंत वाघमारे (दोघेही लालगुडा, वणी) हे दोघे प्रवास करत होते. त्यांच्या ताब्यातील पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये विविध कंपन्यांची 6,240 रुपयांची दारू आढळून आली.
 
 
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवी व ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक साजिद सय्यद यांच्यासह गजानन सावसाकडे, मारोती पाटील, पुरुषोत्तम डडमल, रितेश भोयर, मोनेश्वर खंडरे, नंदकुमार पुप्पलवार, माधव दहीकांबळे व गजानन कुळमथे यांच्या पथकाने यशस्वी पार पाडली.