गोंदिया,
woman-murdered : एका अनोळखी महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी 22 जून रोजी सकाळच्या सुमारास शहरातील सूर्याटोला येथील रेल्वेचौकी परिसरात उघडकीस आली. दोन्ही रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी रक्ताने माखलेल्या अवस्थेत सदर महिलेचा मृतदेह आढळून आला असून या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक रामनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले होते. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून काही महत्त्वाचे नमुने आणि पुरावे हस्तगत केले आहेत. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरिय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. मृत महिला कोण आहे आणि ती कुठली रहिवासी आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. महिलेची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान सद्या पोलिसांसमोर आहे. या महिलेची हत्या कोणी आणि कोणत्या कारणासाठी केली, याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्या असल्यास किंवा मृत महिलेबाबत काही माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.