नागपूर,
yoga day आंतरराष्ट्रीय योग दिननिमित्त सीएमपीडीआय, क्षेत्रीय संस्था-4 नागपूर येथे सामूहिक योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावर्षी “निरोगी व सक्रिय वृद्धत्वासाठी योग” हा विषय ठेवण्यात आला होता. क्षेत्रीय संचालक व्ही. एन. दुपट्टावाला यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून योग थेरपिस्ट डॉ. प्रवीण डबली उपस्थित होते. त्यांनी योगाचे महत्त्व सांगत नियमित सरावाचे आवाहन केले. या कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी, युनियन प्रतिनिधी, कंत्राटी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उत्स्फूर्त सहभाग घेत योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचा संकल्प केला.
सौजन्य: प्रवीण डबली, संपर्क मित्र
नागपूर,
जनार्दन स्वामी महिला योग ग्रुप व हनुमान मंदिर, बेसा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात योगाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अविनाश उडावंत उपस्थित होते. यावेळी त्यांनी महिलांना योगाचे महत्त्व पटवून देत टी-शर्ट आणि योगा मॅटचे वाटप केले. हितेश भजने, गोपालजी कडूकर आणि दिलीपजी सावरकर हेही कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान नियमित योग करून निरोगी राहण्याचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन विद्या खडसे यांनी केले असून, त्यांच्या प्रयत्नांचे सर्वांनी कौतुक केले.
सौजन्य: अशोक, माटे, संपर्क मित्र
नागपूर,
12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्रद्धानंद अनाथालयातील मुलींसाठी आयोजित योग उत्साहात करण्यात आला. आयुष मंत्रालय, इंडियन योगिनी असोसिएशन आणि विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. योग प्रशिक्षक माधुरीराजे भोसले आणि माधुरी इंदुरकर यांनी मुलींना विविध योगासने व योग प्रोटोकॉलचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेडिऑलॉजिस्ट डॉ. शालिनी अशरी उपस्थित होत्या, तर संपूर्ण आयोजनाची जबाबदारी विश्वस्त शिवांगी बुटी यांनी सांभाळली. मुलींनी उत्साहाने योगासने सादर करत वर्षभर नियमित योग करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.
सौजन्य: माधुरी इंदुरकर, संपर्क मित्र
नागपूर,
शंकरनगर नागरिक व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने शंकरनगर मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली होती, त्यामुळे कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात मंडळाचे सचिव मिलिंद शिरपूरकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर अध्यक्ष संजय पत्की यांनी प्रास्ताविक व आभारप्रदर्शन केले. उर्मिला विरमानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी योगासन व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करत नागरिकांना मार्गदर्शन केले. एक तासाहून अधिक काळ नागरिकांनी उत्साहाने योगाभ्यास केला. कार्यक्रमानंतर उपस्थितांना थंड पेय देण्यात आले.
सौजन्य: महेश मोलकर, संपर्क मित्र