अनिल कांबळे
नागपूर,
police custody and beaten up दोन गटात हाणामारी सुरु असताना बीट मार्शल पोहचल्यानंतर पोलिस दोन्ही गटातील युवकांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, नऊ आरोपींनी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीला बळजबरीने ओढून त्याच्यावर लाकडी दंड्याने आणि हातबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना रविवारी पाचपावलीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
यावेळी पोलिसाच्या सरकारी कामात अडथळा निर्माण करत बीट मार्शला धक्काबुक्की करण्यात आली तसेच तू मध्ये येऊ नको, अन्यथा वाईट होईल, अशा शब्दांत धमकीही देण्यात आली. मुजाहिद खान उर्फ पिंटू (टेका नाका), आराग खान तौसिफ खान (टेका नाका), फारूख शेख, फरहान फिरोज खान, आफताब खान मुजीद खान, राहुल गोंडाणे, अब्दुल अनिस उर्फ अब्दुल शफीक व त्यांचे तीन साथीदार अशी आरोपींची नावे आहेत.
नितीन सुभाष राऊत हे पाचपावली पोलिस ठाण्यात बीट मार्शल म्हणून कार्यरत आहेत. २० जून रोजी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास नितीन राऊत हे आसीनगर चौकातील ताज हॉटेल परिसरात गस्त करत असताना त्यांना दोन गटांमध्ये हाणामारी सुरू असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंची विचारपूस केली. चौकशीदरम्यान तौसिफ उर्फ बबलू मोहित खान, फरहान उर्फ बंटी खान आणि त्यांच्या साथीदारांनी राहुल उर्फ गोलू प्रदीप गोंडाणे याच्याशी १९ जून रोजी झालेल्या जुन्या वादातून त्याला जाब विचारल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांना वाद न करता तक्रार देण्याचा सल्ला दिला आणि राहुल गोंडाणे याला पोलीस ठाण्यात घेऊन निघाले. मात्र, याचवेळी आरोपींनी राऊत यांना धक्काबुक्की करत राहुल गोंडाणे याला त्यांच्या ताब्यातून हिसकावून घेतले. त्यानंतर त्याच्यावर लाकडी दांडक्यांनी पुन्हा हल्ला करण्यात आला. बीट मार्शलने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली व धमकी दिली. राऊत यांनी लगेच नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर पाचपावली पोलीस ठाण्याचे अतिरिक्त पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेला तडा गेला असून पोलिसांचा वचक कमी झाल्याचे दिसते.