नवी दिल्ली,
action in the Ram Mandir case अयोध्येतील राम मंदिरात घडलेल्या कथित नैवेद्य आणि देणगी चोरी प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी सरकारने नेमलेल्या तीन सदस्यीय विशेष तपास पथकाने (एसआयटी) आपला प्राथमिक अहवाल अतिरिक्त मुख्य सचिव संजय प्रसाद यांच्याकडे सादर केला आहे. हा अहवाल गोपनीय असल्यामुळे त्यातील तपशील सध्या उघड करण्यात आलेले नाहीत, मात्र या अहवालामुळे पुढील दिवसांत मोठ्या कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

एसआयटीचे सदस्य विजय विश्वास पंत यांनी माहिती देताना सांगितले की, तपास पूर्ण करून प्राथमिक निष्कर्ष शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. हे एक संवेदनशील प्रकरण असल्याने सध्या अधिक भाष्य करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अंतिम अहवाल लवकरच सादर केला जाणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.या प्रकरणाची सुरुवात राम मंदिरात देणगी आणि नैवेद्य व्यवस्थापनात अनियमितता आढळल्यानंतर झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तत्काळ तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करून तपासाचे आदेश दिले होते. या पथकाला प्राथमिक अहवाल एका आठवड्यात आणि अंतिम अहवाल 15 दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
तपासादरम्यान अनेक संशयास्पद बाबी समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. देणगी मोजणारे कर्मचारी, काही ट्रस्ट सदस्य तसेच एसबीआय बँकेशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, कोणावर थेट जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.दरम्यान, या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजही महत्त्वाचा पुरावा ठरत असल्याचे सांगितले जात आहे. या फुटेजमध्ये देणगी मोजणी प्रक्रियेदरम्यान काही अनियमितता दिसून येत असल्याचा दावा केला जात आहे. काही कर्मचाऱ्यांनी नोटा मोजताना गैरव्यवहार केल्याचा आणि प्रक्रिया दरम्यान निष्काळजीपणा झाल्याचा आरोप आहे. तसेच देणगी हाताळणी प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याचेही समोर आले आहे. सध्या एसआयटीच्या अहवालामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून पुढील तपासानंतर मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणात ट्रस्ट व्यवस्थापनाची भूमिका काय होती, यावरही आता सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.