गोंदिया,
agricultural college गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि शेतकरी कुटुंबांसाठी आनंदवार्ता असून, जिल्ह्यात लवकरच शासकीय कृषी महाविद्यालय साकार होणार आहे. या महाविद्यालयामुळे कृषी शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्याची पायपीट कमी होणार असून आधुनिक शेती तंत्रज्ञान, संशोधन आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या नव्या संधी स्थानिक विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यात नवीन शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करणे, शेतकर्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि आधुनिक कृषी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच जिल्ह्यातील कृषी विकासाच्या सर्व प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील नवीन शासकीय कृषी महाविद्यालयाला मंजुरी देण्याबाबत सोमवारी 22 जून रोजी मुंबई, मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग आणि कृषी आयुक्त सुरज मांढरे उपस्थित होते. दरम्यान, मंत्री भरणे यांनी कृषी विभागाच्या जमीन वापराचे धोरण ठरविण्याबाबतची माहिती देतानाच शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्तरावर प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.agricultural college त्याचबरोबर गोंदिया जवळील कारंजा येथील तालुका बियाणे गुणन केंद्राच्या परिसरात विविध पिकांचे प्रात्यक्षिक प्लाँट विकसित करून पुढील काळात कृषी उद्यान उभारण्याची योजना असल्याचे सांगून कारंजा येथील कृषी विभागाच्या जागेवर विविध कार्यालये, प्रयोगशाळा व शेतकरी प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक इमारतींच्या बांधकामाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आला असून जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.