वर्धा,
bank-manager-defrauds-customers : दीपाली खवशी यांनी भारत फायनान्समधून स्वत:च्या नावाने कर्ज काढून चुलत जाऊ संगीता खवशी यांना शेतीसाठी गरज असल्याने पैसे दिले. त्यानंतर कर्जाचे हप्ते वेळोवेळी भरण्यात आले. कर्ज खाते बंद करण्यात आल्याचे सांगीतले. मात्र, व्यवस्थापक आणि कर्मचार्याने खोटी पावती देऊन कर्जाची रकम हडप करून ग्राहक दीपाली खवशी यांची फसवणूक केली. तक्रारीवरून पोलिसांनी बँक व्यवस्थापक कुणाल धानके आणि कर्मचारी सागर मोहेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली खवशी यांनी संगीता खवशी यांना भारत फायनान्समधून स्वत:च्या नावाने २५ ऑटोबर २०२३ रोजी १३ हजार ५४३ रुपये, २१ फेब्रुवारी २०२४ रोजी ४४ हजार १२६ रुपये, ८ मे २०२४ रोजी ४७ हजार १९५ रुपये आणि १२ सप्टेंबर २०२४ रोजी २१ हजार ५४९ रुपये कर्ज काढून दिले होते. कर्जाचा संगीताने प्रत्येक हप्ता भरला. परंतु, एकाही हप्त्याची पावती बँकेने दिली नाही. चारही कर्ज खात्यातील पैसे एकत्रित भरण्याकरिता संगीता बँकेत गेली. ८६ हजार रुपये व्यवस्थापक कुणाल धानके व सागर मोहेकर यांच्याकडे २४ जानेवारी २०२४ रोजी भरले. पैसे भरल्याबाबत संगीताला बुक क्रमांक १२०१८३ मधील पावती १ दिली. त्यानुसार, संगीताने घेतलेले चारही कर्ज खाते बंद करण्यात आल्याचे सांगितले. मात्र, मे २०२६ रोजी तुमच्या नावावर कर्ज पेंडिंग असल्याचा बँकेतून फोन आला. दुसर्या दिवशी संगीताने बँकेत जावून विचारपूस केली असता चारही कर्जखाते मिळून ८२ हजार रुपये खात्यात पेंडिंग दाखविले. व्यवस्थापक कुणाल धानके व कर्मचारी सागर मोहेकर यांनी कर्जाचे ८६ हजार रुपये बँकेत न भरता खोटी पावती देऊन फसवणूक केल्याचे लक्षात येताच दीपाली यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून कुणाल धानके व सागर मोहेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे.
सविता सोनचित्तेचीही फसवणूक
परसोडी येथील सविता सोनचित्ते यांनीसुद्धा याच बँकेतून ५२ हजार २६१ रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याचा हप्ता ६५० रुपये होता. हप्ता वसुलीसाठी व्यवस्थापक कुणाल धानके, सागर मोहेकर आणि योगेश धुर्वे हे नियमित येत होते. पावती मागीतली असता बँकेची कामे ऑनलाईन झाल्याने पावती देण्याची गरज नसल्याचे सांगत होते. कर्जाची सर्व रकम भरली. कर्ज नील झाल्याबाबतची पावती मागीतली असता कुणाल धानके हा नील पावती देत नव्हता. दरम्यान, एप्रिल २०२६ मध्ये बचत गटाकडून कर्ज घ्यायचे असल्याने तुमचे नाव डिफॉल्टरमध्ये गेल्याचे कळले. त्यावेळी सविता सोनचित्ते यांनी भारत फायनान्समध्ये जाऊन चौकशी केली असता ४१ हजार ३६२ रुपये कर्ज शिल्लक असल्याचे बँक स्टेटमेंटमध्ये दिसून आले. कर्जाचे सर्व हप्ते भरले मात्र, स्वत:च्या फायद्यासाठी बँक व्यवस्थापक कुणाल धानके, सागर मोहेकर, योगेश धुर्वे यांनी पैसे बँकेत भरलेच नसून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सविता सोनचित्ते यांनी तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.