बुलढाणा जिल्ह्यात २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

*२ लाख ३० हजारांहून अधिक बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
बुलढाणा, 
national-pulse-polio-immunization-campaign : पोलिओमुक्त भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील २ लाख ३० हजार ४०१ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत. या मोहिमेसाठी आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले असून जिल्हाभरातील सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत.
 
 
 
jh
 
 
 
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक बालकापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे २ हजार ६९ लसीकरण बूथ उभारण्यात येणार आहेत. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ६ हजारांहून अधिक अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बूथवरील लसीकरणानंतर वंचित राहिलेल्या बालकांना घरभेटीद्वारे पोलिओ डोस देण्यात येणार असून शहरी भागात पाच दिवस आणि ग्रामीण भागात तीन दिवस विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी सांगितले की, पोलिओ हा कायमस्वरूपी अपंगत्व निर्माण करणारा गंभीर आजार आहे. त्यामुळे ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब देणे अत्यंत आवश्यक आहे.
 
 
सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना जवळच्या पोलिओ बूथवर घेऊन जाऊन लसीकरण करून घ्यावे. माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, नियमित लसीकरण झालेल्या बालकांनाही पल्स पोलिओचे दोन थेंब देणे आवश्यक आहे. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. या मोहिमेत बसस्थानके, रेल्वे स्थानके, वीटभट्ट्या, बांधकामस्थळे तसेच स्थलांतरित व भटया कुटुंबांच्या वस्त्यांमधील बालकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. विविध विभागांच्या समन्वयातून जनजागृती उपक्रमही राबविण्यात येत आहेत.दोन थेंब जीवनाचे या संदेशासह जिल्ह्यातील सर्व पालकांनी २८ जून रोजी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.