मका व सूर्यफुल पिकांची लागवड वाढवा : उपरीकर

*बीजोत्पादन कार्यक्रम

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
वर्धा, 
arvind-uparikar : मका हे उच्च उत्पादकता असलेले पीक आहे. जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मका पिकाचा वापर अन्नधान्याबरोबरच पशुखाद्य म्हणूनही मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून मका व सूर्यफुल या पिकांची लागवड वाढवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर यांनी केले.
 
 
k
 
 
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सात तालुका बीज गुणन केंद्रांवर महाबीजच्या माध्यमातून ब्रिडर व पायाभूत बियाण्यांचा बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शेतकर्‍यांना वेळेवर व दर्जेदार प्रमाणित बियाणे उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश आहे. उत्पादन साखळीमध्ये बियाणे हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून दर्जेदार बियाण्यांच्या वापरामुळे पीक उत्पादन व उत्पादकतेत लक्षणीय वाढ होण्यास मदत होते. याच अनुषंगाने कृषी विद्यापीठामार्फत प्रसारित करण्यात आलेल्या सोयाबीनच्या पीडीकेव्ही अंबा या वाणाचा बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तूर पिकाच्या तृप्ती व रेणुका या सुधारित वाणांचेही बीजोत्पादन करण्यात येत आहे.
 
 
यावर्षी खरीप हंगामात ७ तालुका बीज गुणन केंद्रांवर प्रत्येकी एक एकर क्षेत्रावर सूर्यफुल व मका पिकांची प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. तेलबिया पिकांमध्ये सूर्यफुल हे अधिक तेलांश असलेले पीक असून पीक विविधीकरणाला चालना देण्यासाठी व शेतकर्‍यांना पर्यायी तेलबिया पीक उपलब्ध करून देण्यासाठी ही प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत.