तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
coffee-with-the-collector : यवतमाळसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात. शिक्षण विभागाने जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या मार्गदर्शनात 2025-2026 या शैक्षणिक वर्षात ‘मिशन एक्सलन्स’ हा उपक्रम प्रभावीपणे जिल्ह्यात राबविला होता.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी व अधिकाअधिक या परीक्षेत यश संपादन करता यावे, यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा, उपशिक्षणाधिकारी नीता गावंडे. उपशिक्षणाधिकारी डॉ. पोलपेल्लीवार यांच्या नियंत्रणात जिल्ह्यात ‘मिशन एक्सलन्स’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला होता.
या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील पाचवी व आठवीच्या तब्बल 4797 विद्यार्थ्यांनी बाजी मारली. यात जिल्ह्यातील पाचवीचे 10 व आठवीचे 10 असे एकूण 20 विद्यार्थी टॉपर ठरले होते. या जिल्ह्यातील ‘टॉप टेन’ विद्यार्थ्यांनी सोमवार, 22 जूनला ‘कॉफी विथ कलेक्टर’ या उपक्रमात जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याशी संवाद साधला. या संवादामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. तसेच जिल्हाधिकाèयांनी उत्तर देताना आयएएस, आयपीएस, इंजिनीअर, डॉक्टर बनण्यासाठी यूपीएससी परीक्षेबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले.
यावेळी विविध प्रश्न गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी विचारले. त्यांचेही निरसन करण्यात आले. तसेच विविध प्रश्न विचारत जिल्हाधिकारी मीना यांच्याशी संवाद साधला. त्याचप्रमाणे या टॉप टेन विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील विविध कार्यालयांतील कामकाज समजावून घेतले.
यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत, शिक्षणाधिकारी कार्यालय, जिल्हा सहनिबंधक कार्यालय, जिल्हा नियोजन कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालयातील विविध प्रशासकीय कामकाज व तेथील अधिकाèयांशी संवाद साधला.
जिल्हाधिकारी विकास मीना, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांच्याशी संवाद साधून प्रशासकीय कामकाजाचा अनुभव घेतला. यावेळी अशोक थोरात यांनी सामूहिक अभ्यास केल्यास यश हमखास प्राप्त होते, असे सांगितले.
या 20 विद्यार्थ्यांसह शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा, उपशिक्षणाधिकारी नीता गावंडे, उपशिक्षणाधिकारी डॉ. शिल्पा पोलपेल्लीवार यांच्यासह गटशिक्षणाधिकारी अमोल वरसे, मार्गदर्शक शिक्षक गोपाळ पांडे, रामदास घावडे, राजहंस मेंढे, रफिक शहा, खोंडे, कुणाल वैद्य आणि पालकांची उपस्थिती होती.