अनिल कांबळे
नागपूर,
doctor commits suicide न्यूरॉन हॉस्पिटलमधील निवासी वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉक्टरने ॲनॅस्थेसियाचे इंजेक्शन टोचून आत्महत्या केली. धंतोली पोलिस हद्दीतील यशवंत स्टेडियमजवळील न्युरॉन्स रुग्णालयात सोमवारी सकाळी सव्वा नऊ वाजता ही घटना उघडकीस आली. ईश्वरचंद्र नरहरी चांदेवार (४२) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. अशाप्रकारे कौटुंबिक कारणातून एका प्रेमविवाहाच करुण अंत झाला. डॉक्टरांच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

मानेवाडा शिवशक्ती नगरातील रहिवासी डॉ. ईश्वर चांदेवार हे न्युरॉन्स रुग्णालयात प्रशासकीय विभागातही सेवा देत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होते. डॉ. ईश्वर यांचे वडिल निवृत्त कर्मचारी आहेत. तर त्यांचा एक भाऊ जिल्हा परिषदेत अभियंता म्हणून कार्यरत आहे. ईश्वर यांचा २००८ मध्ये केरळ येथील वर्गमैत्रिण ज्योसमी उर्फ अनू हिच्याशी ओळख झाली. दोघेही वैद्यकीय क्षेत्राशी जुळलेले असल्यामुळे त्यांची मैत्री झाली. काही वर्षांच्या मैत्रीनंतर त्यांनी प्रेम विवाह झाला होता. त्यांना १५ वर्षांचा एक मुलगा असून तो दहावीत शिकत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, डॉ. ईश्वर आणि पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वादही सुरू होता. यातूनच ते तणावात होते. गेल्या पाच दिवसांपासून ते या तणावामुळे घरी देखील गेले नव्हते. सकाळी सातच्या सुमारास त्यांनी रुग्णालयात नेहमीप्रमाणे काम केले. त्यानंतर ते आपल्या कक्षात गेले.
आत गेल्यानंतर त्यांनी आपल्याच हाताने ॲनॅस्थेसियाचे इंजेक्शन टोचून घेतले. अतिरिक्त डोज झाल्याने ते बेशुद्ध पडले. सकाळी नऊ वाजले तरी कक्षातून प्रतिसाद मिळत नसल्याने सहकाऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र, कक्षाचे दार आतून बंद होते. प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने कक्षाचे दार उघडले असता ते बेशुद्धावस्थेत निपचित पडले होते. डॉक्टरांनी तपासणी करताच मृत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.