शेअर बाजारात भूकंप...गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी पाण्यात!

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Earthquake in the stock market जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांचा फटका आज भारतीय शेअर बाजाराला बसला. आठवड्याच्या सुरुवातीलाच बाजारात मोठी विक्री दिसून आली आणि बीएसई सेन्सेक्स तब्बल ७०० अंकांनी घसरला. तर एनएसई निफ्टीही महत्त्वाच्या पातळ्या गमावत २३,९०० च्या खाली पोहोचला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ५ लाख कोटी रुपयांची घट झाल्याचे दिसून आले.आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेमुळे आशियाई बाजारातही मोठी पडझड झाली. विशेषतः दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात मोठी विक्री झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोस्पी निर्देशांकात जवळपास १० टक्क्यांची घसरण नोंदवली गेली, इतकेच नव्हे तर वाढत्या दबावामुळे काही काळ व्यवहारही स्थगित करावे लागले.
 
 

डे  
अमेरिकेतील टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या घसरणीने जागतिक गुंतवणूकदारांची चिंता वाढवली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील कंपन्यांचे वाढलेले मूल्यांकन आता गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. यामुळे अनेक विदेशी गुंतवणूकदारांनी नफा बुक करत विक्रीचा सपाटा लावला.भारतीय बाजारात याचा सर्वाधिक परिणाम आयटी क्षेत्रावर दिसून आला. देशातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाली. त्यामुळे निफ्टी आयटी निर्देशांक सर्वाधिक दबावाखाली राहिला. बाजारातील एकूणच नकारात्मक वातावरणामुळे सर्वच प्रमुख क्षेत्रांमध्ये विक्रीचे सत्र पाहायला मिळाले. विशेषज्ञांच्या मते, जागतिक आर्थिक अनिश्चितता, भू-राजकीय तणाव आणि टेक क्षेत्रातील वाढलेली अस्थिरता यामुळे सध्या बाजारात सावधगिरीचे वातावरण आहे. पुढील काही दिवस जागतिक घडामोडींवर भारतीय बाजाराची दिशा मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.