प्रश्न विचारून पळ काढणाऱ्यांनी शिकवू नये!

एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
मुंबई,
Eknath Shinde's warning विधानसभेत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत राजकीय वातावरण तापवले. विरोधकांकडे आता कोणतेही ठोस मुद्दे उरले नसून पराभवाच्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत, अशी टीका करत त्यांनी आगामी काळात त्यांना आणखी धक्के बसतील, असा इशाराही दिला.सभागृहाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना लक्ष्य करत शिंदे यांनी अध्यक्षांच्या भूमिकेचे समर्थन केले. सभागृहाचे कामकाज पूर्णपणे नियमांनुसार सुरू असल्याचे सांगत विरोधकांना प्रश्न विचारण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, उत्तर ऐकण्याऐवजी गोंधळ घालणे आणि केवळ राजकीय स्टंटबाजी करणे, एवढाच विरोधकांचा कार्यक्रम उरल्याचा आरोप त्यांनी केला.
 
 
 
Eknath Shinde
 
विरोधकांच्या अनुपस्थितीवरही शिंदे यांनी निशाणा साधला. सरकारला प्रश्न विचारायचे आणि उत्तर देण्याची वेळ आली की सभागृहातून बाहेर पडायचे, ही विरोधकांची जुनी पद्धत असल्याचा टोला त्यांनी लगावला. अशा भूमिकेतून सरकारला धडे देण्याचा प्रयत्न हास्यास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.शेतकरी प्रश्नावरून सरकारला घेरण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नांनाही शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत दिली असून नुकसानभरपाईचे निकष बदलून मदतीची रक्कमही वाढवली असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा विरोधकांचा आरोप दिशाभूल करणारा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
जनतेचा महायुती सरकारवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचा दावा करत शिंदे म्हणाले की, विरोधकांची राजकीय ताकद दिवसेंदिवस कमी होत आहे. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असून आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ विरोधकांवर आली आहे. अध्यक्षांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनाही शिंदे यांनी सुनावले. सभागृहाच्या पावित्र्याचा आदर राखणे सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगत अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला.