गैरहजेरी खपवून घेणार नाही!

मंत्र्यांना फडणवीसांचा कडक दम

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
मुंबई,
Fadnavis reprimands ministers मुंबईत सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना स्पष्ट आणि कठोर संदेश दिला आहे. अधिवेशनादरम्यान प्रत्येक मंत्र्याने सभागृहात उपस्थित राहून कामकाजात सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. मागील अधिवेशनात अनेकदा मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सरकारला अडचणींचा सामना करावा लागला होता. काही महत्त्वाच्या चर्चांवेळी संबंधित मंत्री गैरहजर असल्याने विरोधकांना सरकारला घेरण्याची संधी मिळाली होती. हीच परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री यावेळी सुरुवातीपासूनच कठोर भूमिका घेताना दिसत आहेत.
 
 
 
ministers
बैठकीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे सभागृहाचे कामकाज प्रभावित झाले तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल. प्रत्येक मंत्र्याच्या उपस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल आणि आवश्यक असल्यास त्याबाबत थेट जबाबदारी निश्चित केली जाईल.याशिवाय, अलीकडच्या काळात काही मंत्र्यांच्या सार्वजनिक वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यावरही मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारची प्रतिमा खराब होईल किंवा विरोधकांना टीकेची संधी मिळेल, अशी वक्तव्ये टाळण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
 
 
मंत्रिमंडळातील अंतर्गत मतभेदांबाबतही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. वैयक्तिक मतभेद किंवा नाराजी माध्यमांसमोर व्यक्त करण्याऐवजी ती सरकारच्या अंतर्गत बैठकीत मांडावी, असे त्यांनी सांगितले. कोणतेही मतभेद सामोपचाराने आणि संघटनेच्या चौकटीत सोडवण्यावर त्यांनी भर दिला. मुख्यमंत्र्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आगामी अधिवेशनात सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांवर शिस्त आणि जबाबदारीचे दडपण अधिक वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारची प्रतिमा टिकवून ठेवत विरोधकांना कोणतीही संधी न देण्यावर मुख्यमंत्री विशेष लक्ष केंद्रित करत आहेत.