नागपूर,
nagpur-news : शहरातील अतिक्रमण, तुंबलेली गटारे, सांडपाण्याचा ओव्हरफ्लो आणि कचरा संकलनातील अनियमिततेच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत नागपूर महानगरपालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. महापालिका आयुक्त विपिन ईटनकर यांनी अधिकाऱ्यांना 'झिरो टॉलरन्स' धोरण राबविण्याचे निर्देश देत गटारांमध्ये कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासह वारंवार अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
- अतिक्रमणावर कायमस्वरूपी उपाययोजना
लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनमध्ये झालेल्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी अतिक्रमण हटविल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा अतिक्रमणे होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. विशेषतः लक्ष्मीनगर परिसरातील अनधिकृत मांसविक्री बाजारांमुळे स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यापुढे अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान अनधिकृत विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
- सीवर यंत्रांची वाढ, तक्रार निवारणावर भर
शहरातील सांडपाणी वाहिन्या तुंबण्याच्या समस्येवर उपाय म्हणून प्रत्येक झोनसाठी किमान एक अशा १० नव्या सीवर स्वच्छता यंत्रांची खरेदी केली जाणार आहे. याशिवाय राज्य शासनाकडून आणखी पाच यंत्रे मिळण्याची अपेक्षा आहे. सुट्टीच्या दिवशीही आपत्कालीन तक्रारी हाताळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.
- कचरा व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह
घनकचरा संकलनातील अनियमितता, उशिरा होणारे संकलन, कचऱ्याचे 'ब्लॅक स्पॉट्स', गटारांची अपुरी स्वच्छता, बंद पडलेले उद्यानातील दिवे, स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरता, मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव, पाणीपुरवठ्यातील अडथळे आणि 'अमृत-२' प्रकल्पामुळे खोदलेल्या रस्त्यांचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला.
- नागरिकांसाठी तक्रार निवारण दिन
जबाबदारी निश्चित करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी 'नागरिक तक्रार निवारण दिन' आयोजित करण्यात येणार आहे. तसेच 'न्यूसन्स डिटेक्शन स्क्वॉड' अधिक सक्षम करून शहरातील वारंवार कचरा टाकल्या जाणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.