गणेशोत्सवापू्र्वी फिरंग तलवार होणार नागपुरात विराजमान

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
firang-sword : नागपूरच्या इतिहासाशी आणि भोसले घराण्याच्या वैभवाशी निगडित असलेली श्रीमंत राजे रघुजी भोसले (प्रथम) सेनासाहेबसुभा यांची फिरंग तलवार अखेर यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी उपराजधानीत दाखल होण्याची शक्यता आहे. यावेळचा मुहूर्त तरी हुकू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
 
firang-talwar
 
 
 
नागपूरमधून गहाळ झालेली आणि सोन्याने मढवलेली, गंगेतील मकराच्या शेपटीसारखा आकार असलेली ही ऐतिहासिक तलवार एप्रिल २०२५ मध्ये ब्रिटनमधील सोथेबीज या कंपनीने न्यूयॉर्क येथे लिलावासाठी काढल्याचे उघड झाले होते. त्यानंतर नागपूरचे मुधोजी राजे भोसले यांनी तलवार भारतात परत आणण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्र शासनाने बोली लावून ही तलवार विकत घेतली. १८ ऑगस्ट रोजी आशिष शेलार ही तलवार मुंबईत घेऊन आले होते.
 
 
नागपूरचा ऐतिहासिक वारसा असलेल्या या तलवारीचे जतन नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयात व्हावे किंवा ती भोसले घराण्याच्या स्वाधीन करावी, अशी विनंती मुधोजी राजे भोसले यांनी केली होती. त्यानुसार विजयादशमीनंतर तलवार नागपुरात आणण्याचे नियोजन होते; मात्र निवडणुका आणि इतर प्रशासकीय कारणांमुळे हा सोहळा लांबणीवर पडला. त्यामुळे तलवार नेमकी कधी नागपुरात येणार, याबाबत नागपूरकरांमध्ये उत्सुकता वाढली होती.
 
 
यंदाचा गणेशोत्सव ठरणार ऐतिहासिक
 
 
यासंदर्भात मुधोजी राजे भोसले यांनी सांगितले की, तलवार नागपुरात आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याशी सातत्याने संपर्क सुरू आहे. मागील वर्षी निवडणुका आणि प्रशासकीय कारणांमुळे विलंब झाला. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी तलवार नागपुरात आणण्याचे नियोजन असल्याचे आश्वासन शेलार यांनी दिले आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव नागपूरकरांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
 
 
ऐतिहासिक तलवारीची जंगी मिरवणूक
 
 
नागपूरकरांना हा ऐतिहासिक ठेवा जवळून पाहता यावा, यासाठी तलवार मध्यवर्ती संग्रहालयात ठेवण्याचे नियोजन आहे. तत्पूर्वी भोसले घराण्याच्या वतीने विधिवत पूजन करून रघुजी महाराजांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत भव्य मिरवणूक काढण्याचा मानस असल्याचे मुधोजी राजे भोसले यांनी सांगितले.