नागपूर,
free health check up लोकमंच ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे नुकतेच ज्येष्ठ नागरिकांसाठी एका अनोख्या ‘आरोग्य सहली’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच त्यांना मानसिक आनंद मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. ही आरोग्य सहल कोढाळीजवळील प्रसिद्ध हृदयविकार उपचार केंद्र माधवबाग येथे आयोजित करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरादरम्यान ज्येष्ठ नागरिकांची ईसीजी (ECG), रक्तदाब (ब्लड प्रेशर) आणि रक्तशर्करा (ब्लड शुगर) यांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच, माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी हृदयविकारापासून बचाव, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. आरोग्य तपासणीनंतर ज्येष्ठ नागरिकांच्या मनोरंजनासाठी विविध खेळ आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांनी उत्साहाने सहभाग घेत आनंद लुटला. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन लोकमंच ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष कॅप्टन प्रभाकर विंचूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सचिव डॉ. दीपक शेंडेकर यांच्या नेतृत्वात पार पडले. या उपक्रमाचे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी मनापासून कौतुक करत मंडळाचे आभार मानले.
सौजन्य: दीपक शेंडेकर, संपर्क मित्र