तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
godavari-urban : बँकिंग सेवेसोबतच सामाजिक क्षेत्रात अग्रभागी राहणे आणि समाजाचे ऋण फेडणे ही गोदावरी अर्बनची परंपरा आहे. ‘बोले तैसा चाले’ याप्रमाणे संस्थेने आपल्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती पुन्हा एकदा दिली आहे. महागाव शाखेच्या आठव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येथील तहसील कार्यालयात येणाèया नागरिकांना शुद्ध आणि थंड पिण्याचे पाणी मिळावे, या उदात्त हेतूने संस्थेच्या वतीने एक वॉटर कूलर भेट देण्यात आला आहे.
या वॉटर कूलरचे उद्घाटन संस्थेचे सहायक महाव्यवस्थापक रवी इंगळे यांच्या हस्ते फीत कापून पार पडले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महागावचे तहसीलदार अभय म्हस्के उपस्थित होते.
तहसील कार्यालयात गावखेड्यातून रोज शेकडो नागरिक विविध कामांसाठी येत असतात. उन्हाळा असो वा इतर कोणताही ऋतू, येथे येणाèया लोकांची पाण्यासाठी वणवण होत असे. ‘गोदावरी अर्बन’ने नागरिकांची ही समस्या ओळखून वॉटर कूलर भेट दिल्याने तहसीलदार अभय म्हस्के यांनी संस्थेच्या या लोकहितोपयोगी उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. आवश्यक असलेली मदत दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले.
या कार्यक्रमास महागाव शाखाधिकारी शशांक ढोबळे, सचिन हिंगाडे, जया घड्याले, रामेश्वर शिंदे, सुयोग साकळे, ओमकुमार भोयर, अमोल रावते, प्रवीण आढागळे तसेच शाखेतील इतर कर्मचारी उपस्थित होते. गोदावरी अर्बन ही संस्था केवळ व्यवसाय न करता सामाजिक क्षेत्रात कायम अग्रणी असल्याची भावना यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.