महाराष्ट्रात २४ ते २७ जूनदरम्यान मुसळधार सरींचा इशारा

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
पुणे
heavy downpours in Maharashtra महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर पकडण्यास सुरुवात केली असून पुढील काही दिवस राज्यभर पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २४ ते २७ जूनदरम्यान कोकण, घाटमाथा आणि राज्यातील अनेक अंतर्गत भागांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मुंबईत सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली असून शहरातील अनेक भागांत संततधार पाऊस सुरू आहे. दक्षिण मुंबईपासून उपनगरांपर्यंत पावसाचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे. वाढत्या पावसामुळे शहरात वाहतुकीवरही परिणाम दिसून आला. सायन परिसरात एक बेस्ट बस बंद पडल्याने सकाळच्या गर्दीच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पुढील २४ ते ४८ तासांसाठी मुंबईसह परिसरात पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे.
 
 
heavy downpours in Maharashtra
 
 
कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्येही पावसाने चांगली हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह विविध तालुक्यांत हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. रत्नागिरीतील दापोली परिसरात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी चिंतेत असलेल्या भात उत्पादकांसाठी हा पाऊस जीवनदायी ठरला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला असून अनेक भागांत जोरदार सरी कोसळल्या. देवगडसह किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता कायम असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
 
 
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसामुळे ओढे-नाले तुडुंब भरले असून काही भागांत रस्त्यांवर पाणी साचले आहे. स्थानिक जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषतः कोकण आणि घाटमाथा परिसरात मुसळधार सरींची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.