तेहरान,
Iran begins oil exports जागतिक ऊर्जा क्षेत्रात मोठी घडामोड घडली असून अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या चर्चेनंतर इराणवरील काही निर्बंध शिथिल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या प्राथमिक चर्चेच्या फेरीनंतर दोन्ही देशांमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सामंजस्य निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.या करारानुसार इराणला 60 दिवसांची तात्पुरती सूट देण्यात आली असून या काळात त्याला कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांची मुक्तपणे विक्री करण्याची परवानगी मिळणार आहे. ही सूट 21 ऑगस्टपर्यंत लागू राहणार असून या कालावधीत इराणच्या तेल निर्यातीवर पूर्वी लागू असलेले निर्बंध शिथिल राहतील. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने यासंदर्भात विशेष परवाना जारी केला आहे.

या निर्णयाच्या बदल्यात इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाज वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण न करण्याचे आश्वासन दिले आहे. जागतिक तेल पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.या घडामोडींचा परिणाम थेट जागतिक ऊर्जा बाजारावर होण्याची शक्यता असून भारतासाठीही हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. भारत आपली सुमारे 85 टक्के कच्च्या तेलाची गरज आयातीवर भागवतो. पूर्वी इराण भारतासाठी प्रमुख तेल पुरवठादार देशांपैकी एक होता, मात्र अमेरिकेने निर्बंध लागू केल्यानंतर भारताची इराणवरील तेल आयात मोठ्या प्रमाणात कमी झाली होती.
त्यामुळे आता निर्बंध शिथिल झाल्याने भारताला पुन्हा एकदा स्वस्त आणि स्थिर तेल पुरवठ्याचा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमतींवरही परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.यापूर्वी युक्रेन युद्धानंतर भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी सुरू केले होते. आता इराणकडूनही पुरवठा वाढल्यास भारताच्या ऊर्जा आयात धोरणात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेतील पुढील टप्प्याकडे जागतिक बाजाराचे लक्ष लागले असून येत्या काही दिवसांत या कराराचे दीर्घकालीन परिणाम स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.