संस्कृतसह आधुनिक शिक्षणाची सुवर्णसंधी

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाची प्रवेशप्रक्रिया सुरू

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
नागपूर,
kavikulguru-kalidas-sanskrit-university : राष्ट्रीय प्रत्यायन आणि मूल्यांकन परिषदेकडून (नॅक) 'अ+' मानांकन प्राप्त असलेल्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी विविध पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात केली आहे. संस्कृत भाषेला समर्पित महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विश्वविद्यालयात पारंपरिक शिक्षणासह आधुनिक विषयांनाही समान महत्त्व देण्यात आले आहे.
 
 

jlk
 
 
 
- पारंपरिक आणि आधुनिक अभ्यासक्रमांचा संगम
 
 
रामटेक परिसरात वेद, व्याकरण, दर्शन, साहित्य आणि ज्योतिष या पारंपरिक विषयांसह बी.ए. (शास्त्री) व एम.ए. (आचार्य) अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याशिवाय संस्कृत, मराठी, इंग्रजी, योगशास्त्र, वाणिज्य, बीबीए, बीसीए, लोकप्रशासन आदी आधुनिक विषयांमध्येही पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू झाले आहेत. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्राक्शास्त्री (इयत्ता ११ वी-१२ वी समकक्ष) अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रियाही सुरू आहे.
 
- दोन नवे अभ्यासक्रम सुरू
 
 
यंदापासून एम.ए. भारतीय ज्ञान परंपरा, एम.ए. भारतीय शास्त्रीय ज्ञान परंपरा हे संशोधनाधारित अभ्यासक्रम तसेच बी.एस्सी.-एम.एस्सी. योगिक सायन्स हे नवे अभ्यासक्रम विशेषत्वाने सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांमुळे भारतीय ज्ञानपरंपरेसोबत आधुनिक संशोधनालाही चालना मिळणार आहे.
 
- विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा
 
 
विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वसतिगृह, भोजनालय, संगणक कक्ष, केंद्रीय डिजिटल ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, वैद्यकीय सुविधा, योग प्रशिक्षण आणि ग्रीन जिम यांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रामटेक, अभिनवभारती (वारंगा-नागपूर) आणि रत्नागिरी उपकेंद्रातही अभ्यासक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
 
प्रवेशासंदर्भातील अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन रामटेक परिसर संचालक प्रा. हरेकृष्ण अगस्ती यांनी केले आहे.