खांबाडा येथे वीज पडून एकाचा मृत्यू

* वरोडा तालुक्यात वादळी पाऊस * चंद्रपुरातही पावसाचा शिडकाव

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
चंद्रपूर/वरोडा, 
death-due-to-lightning-strike : चंद्रपूर महानगरात मंगळवार, 23 जून रोजी सायंकाळी दाट काळे ढग दाटून आले आणि पावसाचा शिडकाव झाला. वरोडा तालुक्यात वादळी पाऊस झाला असून, खांबाडा येथे वीज पडून एका कबड्डीपटूचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे.
 
 
 
j
 
 
 
वरोड्यापासून 22 किलोमीटर अंतरावरील चंद्रपूर-नागपूर महामार्गावर असलेल्या तालुक्यातील खांबाडा येथे सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वादळी पावसाला सुरुवात झाली. यावेळी धीरज वाल्मीक जोगे हा 19 वर्षीय युवक आपल्या शेतात आई व काकांसोबत काम करीत होता. परंतु, विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्यामुळे तिघेही धावत सुटले. दरम्यान धीरजच्या अंगावर वीज पडली व त्याचा मृत्यू झाला. गावकर्‍यांनी त्याला त्वरेने घटनास्थळावरून वरोडा उपजिल्हा रुग्णालयात हलविले. पण कोणताच फायदा झाला नाही.
 
 
वरोडा शहरात 22 जूनला झालेल्या वादळी पावसामुळे शहरातील काही ठिकाणी वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या. येथील कॉलरी व शिवाजी वॉर्ड परिसरात मोठी दुर्घटना टळली. कॉलरी वार्डातील कल्याणेश्वर हनुमान मंदिरामागील अनेक वर्षे जुने पिंपळाचे झाड अचानक उन्मळून पडून दशरथ किटे यांच्या घरावर कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले.
 
 
वादळी वार्‍याच्या तडाख्यामुळे झाड कोसळताच परिसरात एकच खळबळ उडाली. झाडाचा मोठा भाग दशरथ किटे यांच्या घरावर पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले. तसेच त्याचा फटका शेजारील दोन घरांनाही बसला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच नगर परिषद प्रशासनाचे कर्मचारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. तसेच रस्त्यावर आणि घरांवर पडलेले झाड हटविण्याचे कामही तात्काळ हाती घेण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते संजय दानव यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना शासनाने तातडीने आर्थिक मदत व योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
 
 
सुदैवान,े या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, तीन कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने प्रशासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. शिवाजी वार्डातील ओम नगर परिसरातील कडुनिंबाचे झाड कोसळण्याची घटना घडली. संस्थेच्या खुल्या जागेला असलेल्या संरक्षण भिंतीवर हे झाड कोसळल्याने संरक्षक भिंतीचे नुकसान झाले आहे.