मुंबई,
Legislative Council members took oath राज्य विधानपरिषदेत आज नवनिर्वाचित 16 सदस्यांचा शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला. नव्या आमदारांच्या आगमनाने विधानभवनात राजकीय हालचालींना वेग आला असून आगामी अधिवेशनात नव्या समीकरणांची चर्चा रंगणार आहे. विविध जिल्ह्यांमधून निवडून आलेल्या या सदस्यांनी आज अधिकृतपणे आपल्या कार्यकाळाची सुरुवात केली.आज शपथ घेणाऱ्या सदस्यांमध्ये विक्रम काकडे, अनिकेत तटकरे, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोतदार, बसवराज पाटील, अरुण लखाणी, अमर राजूरकर, अविनाश ब्राह्मणकर, दुष्यंत चतुर्वेदी, नंदकिशोर महाजन, प्रवीण पोटे, सुहास शिरसाठ, रवींद्र फाटक, राजेंद्र राऊत आणि प्राजक्त तनपुरे यांचा समावेश होता.
या शपथविधीनंतर विधानपरिषदेत सत्ताधारी महायुतीचे संख्याबळ अधिक मजबूत झाल्याचे दिसून आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीने बहुतेक जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले होते. त्याच पार्श्वभूमीवर आजचा शपथविधी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.विशेष म्हणजे, नाशिकमधून अपक्ष म्हणून विजयी झालेले गोकुळ गीते यांनी शपथविधीनंतर महायुतीशी जवळीक अधिक स्पष्ट केली. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये आणखी एक महत्त्वाची घडामोड घडल्याचे मानले जात आहे.
शपथविधी दरम्यान सभागृहात घोषणाबाजीचाही रंग पाहायला मिळाला. अमर राजूरकर यांनी “जय श्रीराम, जय भाजपा” अशी घोषणा दिली, तर राजेंद्र राऊत यांनी “जय शिवराय”चा जयघोष करत आपली भूमिका अधोरेखित केली. यामुळे काही काळ सभागृहात उत्साही वातावरण निर्माण झाले. नव्या सदस्यांच्या प्रवेशामुळे विधानपरिषदेत आता चर्चांना अधिक धार येणार असल्याचे मानले जात आहे. आगामी अधिवेशनात हे नवे सदस्य कोणत्या भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.