पुणे,
Lohagad Ketan Death Case पुण्यातील तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. सुरुवातीला लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान घडलेला अपघात म्हणून पाहिले गेलेले हे प्रकरण आता धक्कादायक हत्याकांडात परिवर्तित झाले आहे. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, केतनचा मृत्यू हा अपघात नसून पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. तपासादरम्यान पोलिसांना समजले की, सिया गोयल हिचे चेतन चौधरी याच्यासोबत प्रेमसंबंध होते. केतनसोबत ठरलेले लग्न सियाला मान्य नसल्याने तिने चेतनसोबत मिळून केतनला कायमचे दूर करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. या कटाची अंमलबजावणी करण्यासाठी लोहगडसारख्या निर्जन ठिकाणाची निवड करण्यात आल्याचे तपासात उघड झाले.

१८ जून रोजी सीया गोयलने केतन अग्रवालला ट्रेकिंगच्या बहाण्याने लोहगडावर नेले. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने दोघे फिरायला गेले असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र, पोलिस तपासात धक्कादायक सत्य समोर आले. निर्जन ठिकाणी संधी साधून चेतन चौधरी याने सीयाच्या मदतीने केतनला खोल दरीत ढकलल्याचा आरोप आहे. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. भर उन्हात चेहरा झाकून फिरणाऱ्या चेतनच्या संशयास्पद हालचालींनी तपासाला निर्णायक वळण मिळाले. अखेर पुरावे समोर आल्यानंतर सिया आणि चेतन या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे, केतन अग्रवालला संपवण्यासाठी यापूर्वीही काही प्रयत्न झाल्याची शक्यता पोलिस तपासत आहेत. प्रेम, विश्वासघात आणि कटकारस्थानाच्या या थरारक कहाणीने केवळ पुणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.