जिल्ह्यातील 86.56 टक्के मतदारांचे ‘मॅपिंग’ पूर्ण

*जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची माहिती

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
चंद्रपूर, 
mapping-of-voters : मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत, त्रृटीरहित व सर्वसमावेशक ठेवण्याकरीता मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) करण्यात येत आहे. या मोहिमेसाठी 1 ऑक्टोबर 2026 ही अर्हता निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात या मोहिमेंतर्गत 86.56 टक्के मतदारांचे ‘मॅपिंग’ पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
 
 
 
j
 
 
 
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात 92.99 टक्के मॅपिंग, चंद्रपूर मध्ये 70.18 टक्के, बल्लारपूर मध्ये 87.25 टक्के, ब्रम्हपुरी 92 टक्के, चिमूर 93.13 टक्के, वरोरा मतदारसंघात 88.04 टक्के अशी एकूण सहाही मतदारसंघात सरासरी टक्केवारी एकूण 86.56 आहे. जिल्ह्यातील एकूण 17 लक्ष 97 हजार 655 मतदारांपैकी 15 लक्ष 56 हजार 064 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून, उर्वरित मतदारांचे मॅपिंग पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेमार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.
 
 
मतदारांनी मतदार यादीतील आपली माहिती तपासून आवश्यक असल्यास नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे, दुरुस्ती अथवा इतर आवश्यक बाबींसाठी विहित कालावधीत दावे व हरकती सादर कराव्यात. अचूक व अद्ययावत मतदार यादी ही मुक्त, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचा पाया आहे. या प्रक्रियेमध्ये बूथस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत घरभेटी घेऊन मतदारांची माहिती पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच राजकीय पक्षांच्या बूथस्तरीय प्रतिनिधींचा सहभाग राहणार आहे. नागरिकांनी या प्रक्रियेमध्ये सहकार्य करून आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहना पंत यांनी केले.
 
असे आहे वेळापत्रक
 
 
प्रशिक्षण व पूर्वतयारी 20 ते 29 जून 2026, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत घरभेटी 30 जून ते 29 जुलै, मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण 29 जुलैपर्यंत, प्रारुप मतदार यादीची प्रसिद्धी 5 ऑगस्ट, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर, दावे व हरकती निकाली काढण्याचा कालावधी 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर आणि अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी 7 ऑक्टोबर रोजी करण्यात येईल.