रायगड,
mass-resignation-of-party-workers : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रायगड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासह पेण तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा दिला आहे. या घडामोडीमुळे रायगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजीनामा देणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अलीकडील संघटनात्मक निर्णयांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नव्या कार्यकारिणीच्या निवड प्रक्रियेत जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य स्थान मिळत नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये वाढत होती.
याशिवाय पक्षाच्या संपर्क नेतृत्वाच्या कार्यपद्धतीबाबतही असंतोष असल्याचे समोर आले आहे. स्थानिक पातळीवरील निर्णय घेताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार अनेकांनी केली. याच नाराजीमुळे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
राजीनामा दिलेल्या कार्यकर्त्यांपैकी बहुतांश जण येत्या काही दिवसांत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.
या सामूहिक राजीनाम्यामुळे रायगडमध्ये मनसेच्या संघटनात्मक ताकदीला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता पक्ष नेतृत्व नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढणार की आणखी गळती होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.