दु:खामधून आनंद शोधण्याचा प्रयत्न

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
वेध...
चंद्रकांत लोहाणा
Modern lifestyle मनुष्याच्या जगण्यासाठी आधुनिकता ही काळाची गरज असली तरी मनाला भरकटवणारी ही आधुनिकता जगण्याला असह्य करीत आहे. त्यामुळे जन्म आणि मृत्यू या दोघांमधील अंतर पार करताना प्रत्येक जण तारेवरची कसरत करीत असतो. माणसाचे आयुष्य हे सुख-दु:ख, यश-अपयश, आशा-निराशा, येणारी अनेक संकटे आणि अनेक समस्यांनी वेढलेले असते. आपल्या जीवनामधील प्रतिकूलतेवर, संकटावर आणि समोर आ वासून उभ्या असलेल्या बिकट परिस्थितीवर मात करून रोजच्या जगण्यामध्ये आनंद फुलविणे हाच जीवन जगण्याचा खरा आनंद आहे.
 
 
adhunikata
 
माणूस जोपर्यंत ही कला आत्मसात करीत नाही, तोपर्यंत त्याची फरफट निश्चित असते. जीवनामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला केवळ सुख येईल असेही नाही. त्यामुळे सहजासहजी सुखावह आणि आनंदी जीवन जगणे कोणालाच शक्य नसले, तरी दु:खामधून आनंद शोधण्याचा प्रयत्न व त्या दु:खाची कारणे शोधण्याचा प्रयत्न केल्यास ती वाट सहज सुलभ करता येऊ शकते. आधुनिकता कितपत आत्मसात करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी ती आपल्या जीवनामध्ये अडसर ठरणार नाही, याचे भान ठेवणेही तेवढेच गरजेचे आहे. आजकाल प्रत्येक जण आपल्यावर असलेल्या जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून पायाला चाके लागल्यागत धावपळ करीत असतो. कोणालाच कोणासाठी वेळ नाही. नात्यानात्यांमधील हरविलेली माणुसकी आणि आपुलकी सर्वाधिक दु:खाचे कारण आहे. एकटेपणा हा माणसाचा क्रमांक एकचा शत्रू असून, त्यामुळे माणूस नैराश्याच्या खाईमध्ये लोटला जात आहे. जीवनामध्ये आम्ही आमच्या संस्कृतीशी फारकत घेऊन आधुनिकतेचा मार्ग स्वीकारल्यास आमच्या पदरामध्ये काय पडेल याचा विचार आम्ही ना कधी केला आहे, ना करीत आहोत. जो वारसा घेऊन आम्ही पुढे जात आहोत, त्यामुळे येणाऱ्या भावी पिढीवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो याचे चिंतनही आम्ही कधी केले नाही. देशामध्ये एकत्रित कुटुंब पद्धतीचा दिवसेंदिवस ऱ्हास होत असल्याने त्यापासून मिळणाऱ्या आनंदाला आम्हीच येणाऱ्या भावी पिढीला वंचित ठेवले आहे.
 
 
Modern lifestyle  चंचल मनाला भौतिक सुखाच्या नादी लावून मनुष्य स्वत: दु:खाला आमंत्रित करीत असतो. क्षणिक सुख हे भविष्यामध्ये अफाट दु:खाचे कारण ठरू शकते, हे माहीत असूनही आमचा मोह आवरता आवरत नाही. क्षणिक सुख हे मृगजळासारखे असते, हे माहीत असूनही त्यामागे धावून अखेर आयुष्याची राखरांगोळी होतेच. आनंदी जीवन जगण्याचा अर्थ असाही नाही की, जीवनामधील सर्व समस्या आणि संकटे आपोआप नाहीसे होतील. येणाऱ्या प्रत्येक काटेरी मार्गावर, प्रत्येक आव्हानांना न भिता सामोरे गेल्यास जीवनामध्ये येणारे प्रत्येक चढउतार स्वत:च्या मनाला स्वीकारणे सहज शक्य होऊ शकते. सदैव आनंदी राहण्यासाठी नेहमी सकारात्मक विचारांना थारा दिल्यास तेवढीच नकारात्मकता कमी होण्यास मदत होऊ शकते. नकारात्मकतेचा मनावर आणि शरीरावर गंभीर परिणाम होतो. जगामधील कोणतीच व्यक्ती परिपूर्ण नाही आणि असे होणे कदाापिही शक्य नाही. त्यामुळे जे काही आहे, ते सांभाळून पुढे वाटचाल सुरू ठेवली तर जीवन जगणे सुकर होऊ शकते. त्यासाठी स्वत:मधील उणिवा ओळखून होत असलेल्या चुकांना सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी गुण-दोष असतातच. त्या दोषांची उजळणी करून ते आपल्या आयुष्यामधून हद्दपार केल्यास तीच व्यक्ती स्वत:ला सांभाळून यशाचे शिखर गाठू शकते आणि जीवनात खऱ्या आनंदाची अनुभूती होते. ‘आनंद’ हा बाजारामध्ये सहज कधीच मिळणार नाही. तो मनाला प्रसन्न करणारी एक आल्हाददायक अनुभूती आहे. ही अनुभूती जीवनामध्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यासाठी सदैव सकारात्मक बाबींना जवळ करून दुसऱ्यालाही आनंद देण्यास शिकले पाहिजे. लोकांना त्यांचे जीवन आनंदाच्या रंगांनी भरण्यास मदत केली पाहिजे. त्यामुळे आपणास परमोच्च आनंदाची अनुभूती होऊ शकते. आपण जे काही दुसऱ्यास देतो, त्याच्या कितीतरी पट परतावा मिळतो, हा ईश्वराचा अलिखित नियम आहे. त्यासाठी पदरचे पैसे खर्च करण्याचीही गरज नाही. आपल्या आयुष्यात दु:ख आणि संकटे कधीच येऊ नये, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. हा मुळात मानवी स्वभाव आहे. त्यासाठी तो आयुष्यभर धडपड करीत असतो. मात्र, ही धडपड चुकली की, आयुष्यामध्ये सर्वकाही चुकते.
९८८१७१७८५६