लोहगडावर केतनचा मृत्यू अपघात नाही तर होणाऱ्या पत्नीचा कट?

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
पुणे,
murder of Ketan's death on Lohagad पुण्यातील लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. सुरुवातीला ट्रेकिंगदरम्यान फोटो काढताना पाय घसरून केतन दरीत कोसळल्याचे सांगितले जात होते. मात्र पोलिसांच्या सखोल तपासानंतर हा अपघात नसून नियोजित कटाचा भाग असल्याची माहिती समोर आली आहे. 24 वर्षीय केतन अग्रवाल हा आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगडावर गेला होता. दोघांचा नोव्हेंबरमध्ये विवाह होणार होता. वाढदिवस खास करण्यासाठी सकाळीच त्यांनी ट्रेकिंगचा प्लॅन केला होता. गडावर फिरत असताना दोघे फोटो काढत होते. त्याचवेळी दरीलगत उभ्या असलेल्या केतनला अचानक ढकलण्यात आल्याचा संशय तपासात बळावला आहे.
  
Lohagad
 
 
लग्न मान्य नसल्याच्या चर्चा
घटनेनंतर केतनच्या होणाऱ्या पत्नीने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर स्थानिकांनी तातडीने लोणावळा ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ बचाव पथकांना घटनास्थळी पाठवले. रेस्क्यू टीमने अथक प्रयत्न करत केतनला दरीतून बाहेर काढले. मात्र गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिला हे लग्न मान्य नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे केतनला कायमचे दूर करण्यासाठी तिने कट रचल्याचा संशय आहे. या कटासाठी तिने आपल्या प्रियकराची मदत घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. नियोजनानुसार केतनला लोहगडावर नेण्यात आले आणि संधी साधून त्याला दरीत ढकलण्यात आल्याचा आरोप आहे.
 
 
 
प्रियकर चौकशीसाठी ताब्यात 
सध्या पोलिसांनी सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून या कटात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही तपास सुरू आहे. मोबाईल डेटा, तांत्रिक पुरावे आणि घटनास्थळावरील माहितीच्या आधारे पोलिस तपास वेगाने सुरू आहे. दरम्यान, केतनच्या कुटुंबाने लग्नासाठी मोठी तयारी केली होती. जयपूरमध्ये तब्बल 17 कोटी रुपये खर्च करून आलिशान पॅलेस बुक करण्यात आला होता. पाहुण्यांच्या प्रवासासाठी दोन विशेष विमानांचीही व्यवस्था करण्यात आली होती. अशा वेळी लग्नाआधीच घडलेल्या या धक्कादायक घटनेने अग्रवाल कुटुंबासह दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.