नागपूरातील दोन 'संघर्षग्रस्त' वाघांची होणार वनात 'घरवापसी'

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
नागपूर,
nagpur-tiger-relocation : मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमुळे पकडण्यात आलेल्या दोन नर वाघांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र वन विभागाने घेतला आहे. राज्यस्तरीय समितीच्या शिफारशीनंतर 'टीयूआय-२२' आणि 'टीयूआय-२५' या दोन्ही चार वर्षांच्या वाघांना पुनर्वसनासाठी योग्य ठरविण्यात आले असून, अनुकूल हवामानात त्यांना टप्प्याटप्प्याने जंगलात सोडण्यात येणार आहे.
 

nagpur-tiger-relocation 
 
 
 
संघर्षानंतर झाली पकड
 
 
मार्च महिन्यात नागपूर वन विभागाच्या हद्दीतून या दोन्ही वाघांना पकडण्यात आले होते. 'टीयूआय-२२' हा देवलापार परिसरात एका महिलेवरील जीवघेणा हल्ला तसेच पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटनांशी संबंधित होता. तर 'टीयूआय-२५' हा पारशिवनी परिसरातील गुरांच्या शिकारीमुळे वन विभागाच्या नजरेत आला होता.
 
आरोग्य आणि वर्तणुकीची कसून तपासणी
 
 
दोन्ही वाघांना नागपूरातील सेमिनरी हिल्स ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर (टीटीसी) येथे हलवून पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून सखोल आरोग्य व वर्तणुकीचे परीक्षण करण्यात आले. तपासणीत हे दोन्ही वाघ पूर्णपणे निरोगी, रोगमुक्त आणि जंगलात स्वतंत्रपणे जगण्यास सक्षम असल्याचे स्पष्ट झाले.
 
'सॉफ्ट-रिलीज' पद्धतीने होणार मुक्तता
 
 
३० एप्रिल रोजी झालेल्या राज्यस्तरीय समितीच्या बैठकीनंतर ११ मे रोजी अधिकृत आदेश जारी करण्यात आले. पुरेसे भक्ष्य उपलब्ध असलेले आणि मानवी हस्तक्षेप अत्यल्प असलेले अधिवास निश्चित करण्यात आले असून, योग्य हवामानात दोन्ही वाघांना 'सॉफ्ट-रिलीज' पद्धतीने वेगवेगळ्या जंगलांमध्ये मुक्त केले जाणार आहे.
 
संवर्धनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
 
 
वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. पकडलेल्या संघर्षग्रस्त वाघाचे पुनर्वसन करून पुन्हा जंगलात मुक्त करण्याची महाराष्ट्रातील ही केवळ दुसरी नोंदलेली घटना असल्याने या उपक्रमाकडे वन्यजीव तज्ज्ञ आणि संवर्धन क्षेत्राचे विशेष लक्ष लागले आहे.