नागपुरात वन्यजीव आरोग्य व्यवस्थापनाचा राज्यातील पहिलाच अभ्यासक्रम

- माफसूच्या पुढाकाराने वन्यजीव उपचारासाठी विशेष तज्ज्ञ पशुवैद्यक

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
wildlife-health-management-course : विदर्भातील वाघांसह इतर वन्यजीवांच्या संवर्धनाला अधिक प्रभावी वैज्ञानिक आधार देण्यासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने (माफसू) महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून विद्यापीठाच्या एम.व्ही.एस्सी. (मास्टर ऑफ व्हेटर्नरी सायन्स) अभ्यासक्रमांतर्गत 'वन्यजीव आरोग्य व्यवस्थापन' हा राज्यातील पहिलाच विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
 
 

j
 
 
 
- वन्यजीव उपचारासाठी विशेष प्रशिक्षण
 
 
नागपूरच्या गोरेवाडा येथील वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रात (डब्ल्यूआरटीसी) हा अभ्यासक्रम राबविण्यात येणार असून, वन्यजीवांमधील आजार, दुखापती, अपघात आणि मानव-वन्यजीव संघर्षामुळे जखमी झालेल्या प्राण्यांवर शास्त्रीय पद्धतीने उपचार करण्याचे विशेष प्रशिक्षण या अभ्यासक्रमातून दिले जाणार आहे.
 
- नागपूर ठरणार नवे प्रशिक्षण केंद्र
 
 
या अभ्यासक्रमासाठी सुरुवातीच्या टप्प्यात चार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. प्रवेश प्रक्रिया भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आयोजित प्रवेश परीक्षेद्वारे पूर्ण करण्यात आली आहे.
 
यापूर्वी अशा स्वरूपाचे विशेष शिक्षण केवळ जबलपूर आणि तामिळनाडू येथील संस्थांमध्ये उपलब्ध होते. आता नागपूरचाही या यादीत समावेश झाल्याने वन्यजीव आरोग्यसेवा आणि संवर्धन क्षेत्रात शहराला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळणार आहे. तज्ज्ञ पशुवैद्यकांची फळी तयार करण्याच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.