मुंबईच्या कॅनव्हासवर झळकले नागपूरचे रंग

शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची दमदार छाप

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
पुरस्कारांसह कलाकृतींनाही उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर,
mumbais canvas मुंबईतील प्रतिष्ठित जहांगीर आर्ट गॅलरी येथे सुरू असलेल्या ४६ व्या मानसून आर्ट शोमध्ये शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, नागपूरच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेचा ठसा उमटवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्रातील विविध कला महाविद्यालयांमधून आलेल्या असंख्य प्रवेशिकांमधून महाविद्यालयाच्या बी.एफ.ए. अंतिम वर्षातील सहा आणि एम.एफ.ए. अंतिम वर्षातील एका विद्यार्थ्याच्या कलाकृतींची निवड झाली असून, महाविद्यालयाच्या साठ वर्षांच्या गौरवशाली परंपरेत हा आणखी एक मानाचा अध्याय ठरला आहे.
 
mumbais canvas
 
विविध विषयांचा प्रभावी कलाविष्कार
निवड झालेल्या कलाकृतींमध्ये ग्रामीण जीवन, मानवी संघर्ष, डिजिटल युगातील एकाकीपणा, निरागसतेचे जतन, व्यक्तिमत्त्व विकास, निसर्ग, अध्यात्म आणि अस्तित्व यांसारख्या विषयांचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. जल, जंगल, जमीन, डिजिटल सायलेन्स, सर्व्हायव्हल, अनुभव, ट्रॅप्ड इनोसन्स, द अग्ली डकलिंग, मावळतीची भाषा आणि निरंकार-३ या कलाकृतींनी परीक्षकांसह रसिकांचेही लक्ष वेधून घेतले.
 
पुरस्कारांनी वाढविला मान
या प्रदर्शनात वैष्णवी शरद दांडेकर यांना प्रतिष्ठेचा 'के. के. हेब्बर आर्ट फाउंडेशन पुरस्कार', तर चंद्रशेखर तायडे यांना 'प्रतिष्ठित कला दालन पुरस्कार' प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे वैष्णवी, चंद्रशेखर, धार्ती कावरे आणि बबीता यांच्या कलाकृती प्रदर्शनादरम्यान आकर्षक किमतीत विकल्या गेल्याने विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना व्यावसायिक स्तरावरही मोठी दाद मिळाली.
 
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि प्राध्यापकांचे प्रभावी मार्गदर्शन असल्याचे मानले जात आहे. विशेषतः प्रा. संजय जठार आणि प्रा. पंकज इटकेलवार यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठित प्रदर्शनात यश मिळाल्याचे अधोरेखित करण्यात आले.
 
साठ वर्षांच्या परंपरेला नवे यश
नुकतेच स्थापनेची साठ वर्षे पूर्ण केलेल्या शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाने गेल्या सहा दशकांत अनेक नामवंत कलाकार घडविले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अधिष्ठाता प्रा. डॉ. विश्वनाथ साबळे यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कलाप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.