वॉशिंग्टन,
NASA El Niño photo प्रशांत महासागरात वेगाने विकसित होत असलेल्या एल निनोमुळे जगभरातील हवामान तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा यांनी दिलेल्या माहितीनुसार, महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानात सातत्याने वाढ होत असून त्याचे परिणाम जागतिक हवामानावर दिसू लागण्याची शक्यता आहे. या बदलाचा थेट परिणाम भारताच्या मान्सूनवरही होऊ शकतो. नासाच्या उपग्रहातून मिळालेल्या माहितीनुसार, विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्रपातळी सामान्यपेक्षा जास्त नोंदवली जात आहे. समुद्रपातळीत होणारी ही वाढ महासागराच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात उष्णता साठत असल्याचे संकेत मानले जातात. गरम पाणी प्रसरण पावल्याने समुद्राच्या पृष्ठभागावर परिणाम दिसून येतो आणि एल निनोची स्थिती अधिक स्पष्ट होते.
हवामान तज्ज्ञांच्या मते, प्रशांत महासागरातील सध्याची परिस्थिती १९९७ मधील शक्तिशाली एल निनोसारखी आहे. त्या काळात जगभरातील हवामानावर मोठा परिणाम झाला होता. सध्याची परिस्थितीही त्याच दिशेने जात असल्याने आगामी काळात तापमानात वाढ, पावसाच्या स्वरूपात बदल आणि हवामानातील अनिश्चितता वाढण्याची शक्यता आहे.या परिस्थितीचा परिणाम केवळ महासागरापुरता मर्यादित राहणार नाही. एल निनो सक्रिय झाल्याने अनेक देशांमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त राहू शकते. उष्णतेच्या लाटांमध्ये वाढ होण्याबरोबरच अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाणही अनियमित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतासाठी ही परिस्थिती विशेष महत्त्वाची मानली जात आहे. एल निनोचा प्रभाव वाढल्यास मान्सून कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम शेती, जलसाठे आणि अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. कृषीप्रधान भारतासाठी मान्सून अत्यंत महत्त्वाचा असल्याने हवामानातील या बदलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.